Fake Police looted the people in front of police station what Nagpur Police do : पोलिसांचा वचक संपला; कुणावर करणार कारवाई?
Nagpur पोलिसांच्या घरी किंवा त्यांच्या घरापुढे चोरी करण्याची हिंमत कुणाची होत नाही. पण घर सोडा इथे तर पोलीस स्टेशनपुढेच चोरी आणि लुटमार सुरू होती. हा प्रकार करणारे पोलिसांच्याच वेशात होते, ही त्याहून आश्चर्याची बाब. म्हणजे तोतया पोलीस आपल्या फाटकापुढे लोकांची लुटमार करत आहे, हे पोलीस स्टेशनमध्ये कुणालाही लक्षात आले नाही.
पोलीस स्टेशनसमोर उभे राहून नागरिकांना लुबाडण्याचे प्रकार सुरू आहेत. अशीच घटना अजनी पोलीस ठाण्यासमोर घडली. मोटारसायकलवरून आलेल्या तोतया पोलिसांनी कारमधून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला अडवले. सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केले. अजनी पोलीस ठाण्याच्या समोरच ही घटना घडली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.
विजय केशवराव महाबुदे (६७, महावीर वॉर्ड, हिंगणघाट) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते शासकीय सेवेतून अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. ७ जानेवारीला ते पत्नीसह बजाजनगरला गेले होते. त्यानंतर पावणेबारा वाजताच्या सुमारास ते मानेवाडा येथे राहणाऱ्या नातेवाइकाकडे जायला निघाले. वंजारीनगर पाण्याच्या टाकीपासून अजनी पोलीस ठाण्याकडे जात असताना मोटारसायकलवरील दोन तरुणांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाबुदे यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
अखेर अजनी पोलीस ठाण्यासमोर त्यांना आरोपींनी थांबविले. खिशातून पोलीस विभागाचे बनावट ओळखपत्र दाखवत ते पोलीस असल्याची बतावणी केली. ‘आम्ही वारंवार तुम्हाला आवाज देत आहोत, थांबले का नाही?’ अशी विचारणादेखील केली. एकाच्या डोक्यावर टोपी होती तर दुसऱ्याने चेहऱ्यावर दुपट्टा बांधला होता. ‘आजकाल लुबाडणूक वाढली आहे. तुम्ही दागिने घालून जाऊ नका’ असे त्यांनी महाबुदे यांना सांगितले व त्यांच्या हातातील अंगठी व गळ्यातील सोनसाखळी काढायला सांगितले.
महाबुदे यांनी अंगठी, सोनसाखळी व पत्नीच्या गळ्यातील हार खिशात काढून ठेवली. मात्र, आरोपींनी दागिने खिशात ठेवू नका, आम्ही कागदात बांधून देतो असे म्हटले. त्यानंतर आरोपींनी एका कागदात दागिने बांधून दिले. त्याचवेळी आणखी दोन जण मोटारसायकलवर आले व त्यांनादेखील आरोपींनी थांबविले. त्यांनादेखील हातातील अंगठ्या काढायला लावल्या. त्यानंतर आरोपी निघून गेले. काही अंतरावर गेल्यावर महाबुदे यांना शंका आली.
त्यांच्या सांगण्यावरून महाबुदे यांच्या पत्नीने कागद उघडला असता त्यात लहान दगड होते. आरोपींनी हातचलाखीने १.०५ लाखांचे दागिने लंपास केले. महाबुदे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात तोतया पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.