Sanjay Raut strongly criticizes Ajit Pawars statement : अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय रावतांची तीव्र टीका
Mumbai : महाराष्ट्रावर कोसळलेल्या अतिवृष्टीच्या संकटाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकारने नुकतीच मदतीची घोषणा करून मंत्रिमंडळासह पूरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्त भागांचा दौरा केला. मात्र, या मदतीवरून शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू केला आहे. खासदार संजय राऊत यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यावर तीव्र टीका करत सरकारला आरसा दाखवला.
राऊत म्हणाले, “शेतकऱ्यांचं आभाळ फाटलं असताना त्याला थिगळ कसं लावणार? सरकार मदतीत हात आखडता घेऊ शकत नाही. अजितदादांनी ‘पैशांचं सोंग आणता येत नाही’ असं वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. पैशांचं सोंग आणता येत नसेल तर सरकार चालवू नका.” त्यांनी अजित पवारांवर थेट निशाणा साधत, “दारोडी खोरीमुळेच ही वेळ आली आहे,” असा घणाघात केला.
Farmers in crisis : अतिवृष्टीने महाराष्ट्रात हाहाकार; शेतकरी उद्ध्वस्त
मंत्रिमंडळाच्या दौऱ्यावरही राऊतांनी सवाल उपस्थित केले. “मराठवाड्याची पाहणी हा केवळ भास आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी काय पाहिलं, काय समजलं? 36 लाख शेतकरी उध्वस्त झालेत, पण त्यांच्या आक्रोशाचा विचार केव्हा करणार?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच, मदतीची जाहिरातबाजी करण्याऐवजी ती गुप्तपणे आणि प्रामाणिकपणे दिली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
याचबरोबर, केंद्र सरकारवरही त्यांनी हल्लाबोल केला. “महाराष्ट्रासाठी केंद्राने काय केलं? कोणतं पथक पाठवलं? शासन मुर्दाड आहे,” असा टोला त्यांनी लगावला. तर एकनाथ शिंदेंच्या मदत कार्यावर भाष्य करताना, “पाण्याच्या बाटलीवर फोटो लावून मदत होत नाही,” असा चिमटा काढला.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत SRA प्रकरणात खिशे तपासल्यास पैसे मिळतील, पण निवडणुकीवर पैसा खर्च होत असताना शेतकऱ्यांसाठी निधी नसतो, अशी टीका केली. “गरीबांना मदत करायची वेळ आली की हे दरोडेखोर बनतात. आमदार-खासदारांसाठी संकटमोचक असतो, पण शेतकऱ्यांसाठी नाही,” असे ते म्हणाले.
देशाच्या सुरक्षेवरूनही त्यांनी केंद्रावर निशाणा साधला. “लडाख हा भारताच्या सीमेचा भाग आहे. चीन लडाखमध्ये घुसला आहे आणि तुम्ही सीमा शांत ठेवू शकत नाही. मग कसले विश्वगुरु?” असा टोला त्यांनी लगावला.