Wife of farmer who committed suicide to stage a protest : पत्नीचा अन्नत्यागाचा इशारा; तीन महिन्यांपासून न्यायाची प्रतीक्षा
Buldhana राज्य शासनाच्या आश्वासनांची अंमलबजावणी होत नसल्याने आत्महत्या केलेल्या युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी २१ जुलैपासून अन्नत्याग आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. ‘‘मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आमच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारल्याचे जाहीर केले, पण त्यापुढे काहीही घडलेले नाही. आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत,’’ अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शिवणी आरमाळ (ता. देऊळगाव राजा) येथील शेतकरी कैलास नागरे यांनी जलसिंचनाच्या प्रश्नावर १३ मार्च २०२५ रोजी आत्महत्या केली होती. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सकारात्मक घोषणा केली होती. मात्र चार महिने उलटून गेले तरी कुटुंबाला कोणतीही ठोस मदत मिळालेली नाही, असा आरोप स्वाती नागरे यांनी केला.
स्वाती नागरे यांनी बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालय (सिंदखेडराजा) व तहसील कार्यालय (देऊळगाव राजा) येथे निवेदन दिले. त्यात १२ दिवसांच्या आत मुख्यमंत्र्यांची भेट द्यावी, अशी मागणी केली. ‘‘राजकीय पक्ष, संघटना, मंत्री अंत्यविधीला उपस्थित होते, आश्वासने दिली, पण कृती काहीच झाली नाही. प्रशासनाची हलगर्जीपणाच माझ्या पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरली,’’ असा आरोपही त्यांनी केला.
त्यांच्या मते, ‘‘धरणावरील झाडंझुडपं पतीच्या बलिदानानंतरच हटवली गेली. म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही. जर पुन्हा एखादं बलिदानच न्याय मिळवण्याचा मार्ग ठरत असेल, तर सरकारने त्याची जबाबदारी स्वीकारावी.’’
Centre of Indian Trade Unions : कामगारांना गुलाम बनवणाऱ्या श्रमसंहिता रद्द करा
सध्या अधिवेशन सुरू असताना नागरे कुटुंबाच्या मागण्यांची दखल घेत राज्य सरकारने स्पष्ट भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले. अन्यथा २१ जुलैपासून आपल्या राहत्या घरी पतीच्या प्रतिमेसमोरच अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.