Sudhir Mungantiwar’s advice to the officials of Mahavitaran : सुधीर मुनगंटीवार यांच्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुचना
Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यात विजेचा खेळखंडोबा हा नित्याचाच झाला आहे. हा विषय राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यसाय मंत्री आमदार सुधीर मुुनगंटीवार यांनी गांभीर्याने घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, मुल, पोंभूर्णा आणि चंद्रपूर तालुक्यांमध्ये वीज पुरवठा खंडीत होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. त्यामुळे महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी विजेचा हा खेळखंडोबा तातडीने बंद करावा, अशा सुचना त्यांनी दिल्या आहेत.
सातत्याने वीज खंडीत होत असल्यामुळे शेतकरी आणि लघु उद्योगांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन या समस्येचे तातडीने निराकरण करा, असेही आमदार मुनगंटीवार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले. बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील महावितरण विभागाच्या तक्रारींसदर्भात नियोजन भवन येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी उपरोक्त सुचना दिल्या.
बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजप नेते चंदलसिंह चंदेल, महावितरणचे मुख्य अभियंता हरीश गजभे, महावितरणच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, भाजप महिला प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, भाजप महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, सुरज पेद्दुलवार, नम्रता ठेमस्कर उपस्थित होते. महावितरण विभागात कर्मचाऱ्यांची उपलब्धता, व्यवस्थापनासाठी अपुरा निधी आणि कर्मचारी टेलिफोनवर उपलब्ध न होणे, या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. वादळ व जोरदार वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाल्यास अनेक वेळा तीन – तीन दिवस वीज येत नाही.
चंद्रपूर हा राज्यातील प्रमुख वीज उत्पादन करणारा जिल्हा आहे. असे असतानाही येथीलच लोकांना अंधारात राहावे लागते. ही बाब अत्यंत गंभीर आहे. महावितरणने सोमनाथ रस्त्यावर कवर कंडक्टर लावण्याची कार्यवाही करावी. जंगल परिसरात वीज पुरवठा खंडित झाल्यास वन विभागाशी समन्यवय साधून झाडाच्या फांद्यांची छटाई करावी आणि विद्युत तार तुटल्यास त्याची तात्काळ दुरूस्ती करावी, असेही निर्देश आमदार मुनगंटीवार यांनी दिले.
पोंभूर्णा हा मागास तालुका आहे. त्यामुळे महावितरणने विशेष बाब म्हणून फिडर मंजूर करून घ्यावे. यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी सादर करावा. जेणेकरून आवश्यक मंजुरी मिळवून देता येईल. विभागातील रिक्त पदे तातडीने भरावी आणि नवीन डीसी कार्यालय स्थापित करण्याची कार्यवाही करावी. मुल तालुक्यात नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. एफडीसीएम विभागाने अद्याप जागा हस्तांतरीत केलेली नाही. त्यामुळे प्रकरण प्रलंबित आहे. याबाबत तातडीने पाठपुरावा करण्याची सुचनाही आमदार मुनगंटीवार यांनी केली.
बल्लारपूर पेपर मिल परिसरात वीज पुरवठा नेहमीच खंडीत होतो. त्यामुळे तेथे अंडरग्राऊंड लाईन टाकणे आवश्यक आहे. यासाठी महावितरणने २२ कोटींचा प्रस्ताव तयार करून डिस्कॉमकडे मंजुरीसाठी पाठवावा. तसेच बल्लारपूर येथे ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ब्रांच ऑफीस सुरू करण्याची कार्यवाही करावी. येथील बील वसुली ९५ टक्के आहे. ही बाब महावितरणसाठी आर्थिक दृष्ट्या स्थैर्य देणारी आहे. दुर्गापूर येथील सबस्टेशन ताडाळी येथे स्थलांतरीत करण्यात आले ते पूर्ववत करण्यात यावे आणि दुर्गापूरला ग्राहकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने स्वतंत्र कॉल सेंटरची उभारणी करावी, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.
Flood situation : बोर्डा, चिचपल्लीची पुनरावृत्ती होऊ नये, मामा तलाव तातडीने दुरूस्त करा !
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मंजूर मनुष्यबळ व रिक्त पदांच्या अनुषंगाने डिस्कॉमसोबत सविस्तर बैठक घेण्यात यावी आणि महावितरणच्या तांत्रिक सुधारणांसाठी आवश्यक प्रस्ताव घेणे आवश्यक आहे. त्यासाठी भौतिक सुविधा प्राधान्याने उपलब्ध कराव्या. मोबाईलवरून तक्रार नोंदवण्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर विकसीत करावे. ‘वंदे मातरम्’ आणि ‘हॅलो चांदा’ या संकल्पनांच्या धर्तीवर महावितरणचे तक्रार निवारण अॅप कार्यान्वित करावे, असेही निर्देश आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.