Revolutionary farmers’ organization will block highway if decision is not taken by April 26 : २६ एप्रिलपर्यंत निर्णय न घेतल्यास महामार्ग रोखणार
Buldhana : राज्य सरकारकडून सरसकट कर्जमाफीची मागणी करत क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी पारंपरिक वारकरी वेशात टाळ-मृदुंगाच्या गजरात लोणार तहसील कार्यालयावर वारी करत धडक दिली. या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेतील तीन महिने उलटूनही याबाबत कोणताही ठोस निर्णय त्यांनी घेतलेला नाही. त्यामुळे क्रांतीकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. शेतकऱ्यांच्या उद्विग्नतेला सरकारच्या वागणुकीने आणखी धार दिली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बेताल वक्तव्य शेतकऱ्यांसह सामान्यजनात संतप्त प्रतिक्रिया निर्माण करत आहेत.
Vidarbha Farmers : निव्वळ घोषणा; कर्जमाफीच्या प्रतीक्षेत हजारो शेतकरी!
२६ एप्रिलपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस निर्णय न झाल्यास, लोणार तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा गंभीर इशारा सहदेव लाड यांनी दिला आहे. शेतकऱ्यांनी वारकऱ्यांच्या वेशात आंदोलने करत आपल्या मागण्या शांततेत मांडल्या आहे. पण शासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यातील आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत या आंदोलनातून मिळाले आहेत.
शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन महायुतीने विधानसभा निवडणुकीपूर्वी दिले होते. सातबारा कोरा करू, असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांची मते मिळवली. सत्तेत येताच संकल्पनाम्यातील आश्वासनाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार वेगवेगळे बोलत आहेत. कर्जमाफी देण्यासारखी परिस्थिती सध्या नाही, असे अर्थमंत्री अजित पवार यांनी २८ मार्चला जाहिर करून टाकले. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली. पण आता कर्जमाफी मिळाली नाही, तर शेतकरी आक्रमक होतील, यात शंका नाही.