Manoj Jaranges anger; Criticism from farmers’ protest : मनोज जरांगे यांचा संताप; शेतकरी आंदोलनातून टीका
Nagpur : सातबारा कोरा करावा आणि संपूर्ण कर्जमाफी द्यावी या मागण्यांसाठी नागपूरमध्ये सुरु असलेल्या शेतकरी एल्गार आंदोलनात आज, मराठा आरक्षण चळवळीचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गेल्या चार दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असून, दोन दिवसांपासून नागपूर शहर अक्षरशः ठप्प झाले आहे.
मनोज जरांगे यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना सांगितले की, “मी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा आहे, त्यामुळे या आंदोलनात सहभागी होणे माझे कर्तव्य आहे.” त्यांनी आंदोलकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले, पण त्याचवेळी सरकारच्या खेळीवर कठोर शब्दात हल्ला चढवला. “सरकारचा डाव फक्त प्रतिडावानेच मोडता येतो. मराठा आंदोलनात आम्ही हे अनुभवलंय. सरकारला घोडे लावल्याशिवाय ते वठणीवर येणार नाही,” असे ते म्हणाले.
जरांगे यांनी सरकारवर आरोप केला की, शेतकरी आंदोलन फोडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी नवा डाव टाकला आहे. “सरकारने बच्चू कडू यांना मुंबईला बोलावलं. पण प्रश्न असा आहे की सरकारला नागपूरला येण्यास काय अडचण आहे? त्यांचे पाय मोडले आहेत का? त्यांना रॉकेल लागते का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
“सातबारा कोरा आणि कर्जमाफी या शेतकऱ्यांच्या जगण्याशी निगडित मागण्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकरी पुन्हा रस्त्यावर येतील. हे सरकार फक्त डावपेच आखण्यात व्यस्त आहे, पण शेतकऱ्यांच्या आयुष्याचा विचार करत नाही,” असा आरोपही जरांगे यांनी केला.
मनोज जरांगे यांनी आंदोलकांना एकजूट टिकवण्याचे आवाहन केले. “सगळ्या शेतकरी संघटनांचे नेते एकत्र आले हे दृश्य प्रेरणादायी आहे. ही एकता जर तशीच टिकली, तर सरकारला नमायलाच लागेल,” असे ते म्हणाले.
सरकारने आंदोलनाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर यानंतरचा संघर्ष आणखी तीव्र होईल, असा इशारा त्यांनी दिला. “शेतकऱ्यांची तळमळ, त्यांचा कष्ट वाया जाऊ देऊ नका. हे आंदोलन फक्त मागण्यांसाठी नाही, तर आपल्या सन्मानासाठी आहे,” अशा शब्दांत मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला.








