Unfortunate events dampen festive spirit : दुर्दैवी घटनांनी सणाच्या उत्साहावर पाणी फेरले
Mumbai: दिवाळीच्या आनंदाच्या पार्श्वभूमीवर राज्यातून दोन भीषण अपघातांच्या बातम्यांनी दु:खाचे सावट पसरवले आहे. नंदुरबार आणि वाशिम जिल्ह्यात घडलेल्या दोन स्वतंत्र अपघातांत एकूण ९ जणांचा मृत्यू झाला आहे. धनत्रयोदशीच्या सणादिवशी झालेल्या या दुर्घटनांमुळे सणाचा उत्साह काहीसा मावळला आहे.
पहिली घटना नंदुरबार जिल्ह्यातील चांदशैली घाटात घडली. अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीचे चालकावर नियंत्रण सुटल्याने वाहन दरीत कोसळले. या अपघातात ६ भाविकांचा मृत्यू झाला असून १० पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी भीषण दृश्य निर्माण झाले असून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.
दुसरी दुर्घटना वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर घडली. मालेगाव-जउळका रेल्वे दरम्यान डव्हा पेट्रोल पंपाजवळ रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास इनोव्हा कार भरधाव वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट डिव्हायडरवर आदळली. या भीषण अपघातात म्यानमारमधील एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ४० वर्षीय वडील, १३ वर्षीय मुलगा आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. कुटुंब मुंबईहून जगन्नाथ पुरीकडे जात होते, अशी माहिती समोर आली आहे. धडकेची तीव्रता एवढी होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला.
BJPs question ::दीड कोटींची ‘डिफेंडर’ कोणत्या कमिशनमधून आली?
या दोन्ही अपघातांमुळे राज्यात हळहळ व्यक्त होत आहे. सणासुदीच्या काळात अपघातांची मालिका सुरूच असून निष्पाप नागरिकांचा जीव जात असल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन केले असून दिवाळीच्या उत्सवामध्ये दु:खाचा शोककळा दाटल्याचे चित्र राज्यभर दिसत आहे.
____