44 lakhs misappropriation in market committee : ई-निविदा, साफसफाईचे कंत्राट; चौकशी अहवालात दोषारोपण
Amravati येथील बाजार समितीमध्ये ई-निविदा, साफसफाई कंत्राटमध्ये ४४ लाखांचा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे पदाधिकारी व सचिव यांच्यावर कारवाई करून रक्कम वसुल करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी संघर्ष समितीद्वारा सोमवारी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाच्या नियमबाह्य कारभाराविरोधात यापूर्वीही तक्रारी आल्या होत्या. शेतकरी संघर्ष समितीचे सचिव शेखर औगड, प्रकाश साबळे, उमेश महिंगे यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना या तक्रारी केल्या होत्या. त्यावर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी चौकशी समिती गठित केली. समितीचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे. यामध्ये ४४ लाख रुपये ई-निविदा व साफसफाई कंत्राट खर्च निधीमध्ये सर्व संचालक, सभापती, उपसभापती, सदस्य, सचिव आदींनी अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे नमूद आहे.
या पदाधिकाऱ्यांवर आता महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम १९६३ नियम १९६७ व उपविधीनुसार कार्यवाही केली जाणार आहे. असे समितीचे सचिव शेखर औगड यांनी सांगितले. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या पैशावर पदाधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचा आरोप अवघड यांनी केला. याबाबत बाजार समितीचे सचिव यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.
सरकार क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड
शिक्षक बँक, महिला बँक आणि अचलपूर येथील बाजार समितीतील घोटाळा पुढे आला. त्यानंतर आता अमरावती येथील बाजार समितीमध्ये झालेल्या घोळ पुढे आला आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राला भ्रष्टाचाराची कीड लागली असल्याचे दिसून येत आहे. एकापाठोपाठ एक घोटाळे सुरू आहेत. आणि असे असताना सहकारावर नियंत्रण ठेवणाऱ्या उपनिबंधक कार्यालयाकडून कोणतेही ठोस पावले उचलण्यात येत नसल्याबाबत आश्चर्य व्यक्ते केले जात आहे.