Congress state president Harshvardhan Sapkal’s attack on BJP Mahayuti government : अंडरग्राऊंड मेट्रो की अंडरवॉटर मेट्रो,
Mumbai : मुंबईत कधी नव्हे येवढा पाऊस आज झाला आहे. मे महिन्यातील शतकातला हा सर्वाधिक पाऊस असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. उद्या (ता. २७) याहीपेक्षा मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला आहे. मुंबई आणि उपनगरांची आज जी अवस्था झाली, त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईत आज (२६ मे) भाजप महायुती सरकार आणि त्यांच्या प्रशासक राजची गटारगंगा पहायला मिळाली, या शब्दांत सपकाळ यांनी सरकारला फटकारले आहे.
रस्ते, रेल्वे ट्रॅक सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. चाकरमानी मुंबईकरांचे कामावर जाताना प्रचंड हाल झाले. बीएमसी दरवर्षी कोट्यवधी रुपये मुंबईतील नालेसफाई म मान्सूनपूर्व कामांवर खर्च करते. पण दरवर्षी पहिले पाढे पंचावन्न, हेच चित्र दिसते. जनतेच्या पैशांवर कंत्राटदार, सत्ताधारी आणि अधिकारी डल्ला मारतात. आपले खिसे भरतात. त्यामुळे मुंबईकरांचे दरवर्षी असेच हाल होतात, असा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला आहे.
मतं मागायला बोटीने जावे..
पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली. रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप आले आहे. ठिकठिकाणी पाणी साचून मुंबईची तुंबई झाली आहे. अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन अंडर वॉटर झाले आहेत. रुग्णालये जलमय झाली आहेत. एका पावसाने भाजप, शिंदे सेना आणि अजित पवारांच्या भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पाडले आहे. यांचे कर्तृत्व इतके महान आहे की आता यांना रस्त्यांवरून बोटीनेच घरोघरी जावे लागणार आहे, असे सपकाळ म्हणाले.
Irrigation Department : खारपाणपट्ट्यांना सिंचनाचा दिलासा; ४२६ कि.मी. कालव्याचे सर्वेक्षण पूर्ण
नाले सफाई नव्हे, सत्ताधाऱ्यांची हातसफाई..
मुंबई महानगरपालिकेने २०२५-२६ या वर्षासाठी ७४ हजार ४२७ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला व तो सन २०२४-२५ च्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत सुमारे १४.९९ टक्क्यांनी अधिक होता. हा अर्थसंकल्प बीएमसीच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला. रस्ते वाहतूक विभागासाठी या अर्थसंकल्पात ५१०० कोटी रुपयांची तरतूद आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्रावर ५५४५ कोटींची तरतूद आहे. नाले सफाई आणि मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी ३९५ कोटी रुपये खर्च केले गेले. यासाठी तब्बल ३१ कंत्राटदारांना काम दिले. पण येवढा पैसा खर्च करूनही मुंबईतील नालेसफाई झाली नाही, तर केवळ सत्ताधाऱ्यांची हातसफाई झाली. मुंबईला लुटणाऱ्या या भ्रष्ट टोळीला जनता माफ करणार नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.