Dial 112 saved 800 lives Four and a half thousand women got help : साडेचार हजार महिलांना मिळाली मदत
Wardha अडचणीच्या वेळी महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले, बालकांसह गरजूंना तत्काळ मदत मिळावी, यासाठी डायल ११२ हेल्पलाइन सेवा सुरू करण्यात आली आहे. यात २०२४ या वर्षभरात जिल्ह्यात ४६७३ महिलांच्या मदतीला पोलिस पथक धावले. त्यांनी अपघातस्थळी पोहोचून ८०० जखमींचे प्राण वाचविले आहेत. सरकारने एखादी सुविधा उपलब्ध करून दिली तरीही प्रशासनाची तत्परता आवश्यक असते. वर्धा जिल्ह्यातील पोलिसांनी ही तत्परता सिद्ध केली आहे.
अडचणीतील लोकांना तत्काळ पोलिस मदत मिळावी, यासाठी डायल ११२ ही हेल्पलाइन सेवा करण्यात आली. त्यावर कॉल call येताच अवघ्या काही मिनिटांत पथक घटनास्थळी दाखल होते. महिला, मुली, मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना यामुळे मदत होते. अपघाताची घटना घडल्यानंतर सर्वांत आधी डायल ११२ चे पथकच दाखल होते. त्यामुळे अपघातग्रस्तांसाठी ही सेवा वरदान ठरत आहे.
Nitin Gadkari : उपेंद्र शेंडे यांनी संकटातही तत्वांशी तडजोड केली नाही !
ज्या ठिकाणी चारचाकी वाहन जात नाही, अशा ठिकाणी दुचाकीवरील पथक मदतीला धाऊन जाते. त्यामुळे अनेकांना दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात २०२४ या वर्षात १४ हजार ८०५ ठिकाणी डायल ११२ चे पथक पोहोचले. यात ४६७३ कॉल हे महिला संबंधित मदतीचे होते. तेथे पथकाने तत्काळ पोहोचून मदत केली. ८०७ अपघातांच्या ठिकाणी पोहोचून जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले. त्यामुळे बहुतांश जखमींना जीवदान मिळाले.
अकारण call करू नका
डायल ११२ ही अत्यावश्यक सेवा आहे. या नंबरवर खोटी माहिती दिल्यास गुन्हा दाखल होतो. यात ६ महिने कारावास व आर्थिक दंडही होऊ शकतो. त्यामुळे डायल ११२ वर खोटी माहिती देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते. डायल ११२ वर आग, अपघात, चोरी, भांडण, मृतदेह, प्राणीसंबंधित, ज्येष्ठ नागरिक आदी संबंधित फोन आले आहेत. माहिती देण्यासाठीही कॉल आले आहेत. डायल ११२ वर कॉल केल्यास तत्काळ मदत मिळते. त्यामुळे अडचणीत सापडलेले नागरिक यावर कॉल करीत आहेत.