Sports competition for Irrigation Department : जलसंपदा विभागाच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन, १६०० कर्मचारी अधिकाऱ्यांचा सहभाग
Nagpur क्रीडा स्पर्धेमध्ये खेळाडुवृत्तीचे उत्तम प्रदर्शन करा. आयुष्यात शरीर सदृढ ठेवा. व्यसनांपासून दूर रहा आणि जलसंपदा विभागासाठी कार्यक्षमतेने कार्य करा, असा संदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या रवि नगर येथील क्रीडा संकुलात ते बोलत होते. जलसंपदा विभागाच्या चतुर्थ राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा-2025 चे उद्घाटन महाजन यांच्या हस्ते झाले. वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे आदी उपस्थित होते.
जलसंपदा विभागाच्या एकूण 9 विभागांचे 1600 खेळाडू सहभागी झाले असून 2 फेब्रुवारी 2025 पर्यंत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री श्री. महाजन म्हणाले, राज्यातील उद्योग, शेती, उर्जा प्रकल्प आदिंना पाणी पुरवठा करण्याची महत्वाची भूमिका जलसंपदा विभाग पार पाडत आहे. विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेमुळे हे कार्य अधिक प्रभावीपणे करता येते. त्याकरिता त्यांचे आरोग्य उत्तम राहणे आवश्यक आहे. उत्तम आरोग्यासाठी व्यायाम, आहार, विहार गरजेचा आहे.
Guillain Barre Syndrome : जिल्ह्यात GBS चे ४ संशयित रुग्ण; प्रशासन अलर्ट मोडवर
तसेच व्यसनापासून दूर राहणे तेवढेच महत्वाचे आहे. हे लक्षात घेवूनच या विभागाचा मंत्री म्हणून 2017 मध्ये छत्रपती संभाजी नगर येथे जलसंपदा विभागाची पहिली राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. स्वत: एक उत्तम खेळाडू असून गेल्या जवळपास 40 वर्षांच्या राजकीय जीवनातील व्यस्ततेतही नियमीत व्यायाम करतो. तसेच व्यसनापासून दूर असल्याचे सांगून त्यांनी स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडुंना शुभेच्छा दिल्या.
वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी शासकीय नोकरीमध्ये कामासोबतच खेळाला महत्त्व असल्याचे सांगितले. तसेच राज्य शासनाच्या विविध विभागांच्या आंतरविभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.