Gondia Police Transport Department’s letter to parents of minors : वाहतूक विभागाचे अल्पवयीन मुलांच्या पालकांना पत्र
Gondia अल्पवयीन मुलांचा दुचाकीवरून सुरू अससेला उनाडपणा सध्या इतरांसाठी त्रासदायक ठरत आहे. एकतर या मुलांकडे परवाना नाही. दुसरं म्हणजे त्यांचे ड्रायव्हिंग अत्यंत तुफान असल्यामुळे त्यांच्यासह लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अशात गोंदिया वाहतूक पोलिसांनी नवा फंडा शोधून काढला आहे. वाहतूक विभागाने थेट अल्पवयीन मुलांच्या पालकांनाच पत्र पाठवले आहे.
पालकच अल्पवयीन वाहन चालकांना वाहन चालविण्यास प्रवृत्त करीत आहेत. जो कायदेशीर गुन्हा आहे. १८ वर्षांखालील विद्यार्थी वाहनांतून शाळा-महाविद्यालयांमध्ये जात असल्याचे अनेकदा दिसून येते. बऱ्याच वेळा विद्यार्थी ट्रिपल सीट देखील दिसले आहेत. ज्यामुळे अपघात होतात. पालकांनी याकडे लक्ष द्यावे, अन्यथा विभागाकडून कडक कारवाई करण्यात येईल, असे वाहतूक विभागाने बजावले आहे.
Panchayat Samiti sabhapati : नवा गडी नवा राज, सोडत निघताच नावांची चर्चा सुरू!
जिल्हा वाहतूक विभागाने अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. चार दिवसांत ८० अल्पवयीन व ट्रिपल सीट वाहनचालकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून १ लाख १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे अल्पवयीन वाहन चालकांसह त्यांच्या पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नागेश भास्कर यांनी अल्पवयीन वाहनचालकांना सल्ल्यासाठी पत्र दिले आहे. हे पत्र जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये तसेच सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आले आहे. त्यात १८ वर्षांखालील विद्यार्थी वाहनाने शाळा-कॉलेजमध्ये येतात. अल्पवयीन विद्यार्थ्यांना वाहन चालविण्यास परवानगी दिल्यास, मोटारवाहन दुरुस्ती कायदा २०१९ च्या कलम १९९ नुसार, पालक मोटरवाहन मालकास ३ महिने कारावास व २५ हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
सर्व विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या माध्यमातून याची जाणीव करून द्यावी, असे सांगण्यात आले आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत संदेश पोहोचविण्यास सांगितले आहे. जेणेकरून १८ वर्षांखालील विद्यार्थी वाहनातून शाळा- महाविद्यालयांमध्ये येऊ नयेत. विभागाकडून अल्पवयीन वाहनचालकांवर सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. जिल्हा वाहतूक विभागाने कारवाईची ही मोहीम तीव्र केली आहे