Threat to delete Facebook ID; 17-year-old commits suicide due to stress : १७ वर्षीय तरुणाची तणावातून आत्महत्या, धमकी की खून?
Tiroda फेसबुक आयडी डिलीट करण्यासाठी धमकी देण्यात आल्यानंतर तणावात गेलेल्या 17 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 27 मार्च रोजी जमुनिया येथे उघडकीस आली. विवेक छगनलाल भैरम (रा. जमुनिया, ता. तिरोडा) असे मृत मुलाचे नाव आहे. एका गूढ फेसबुक आयडीच्या वादामुळे त्याने आपले जीवन संपवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
23 मार्च रोजी एकोडी गावातील चार तरुण विवेककडे आले आणि त्याला फेसबुक आयडी डिलीट करण्याची धमकी दिली. ही आयडी का डिलीट करायची? त्यातून नेमके काय पोस्ट झाले होते? हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. मात्र, या धमकीमुळे घाबरलेल्या विवेकला ते जबरदस्तीने शेताकडे घेऊन गेले.
MLA Manoj Kayande : हंडाभर पाण्यासाठी भटकंती; अधिकाऱ्यांवर गुन्हे?
त्या दिवशी तो मोठ्या धसक्यात घरी परतला. आईने विचारले असता त्याने काहीही सांगितले नाही आणि ही बाब दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुसऱ्याच दिवशी सायंकाळी ते चार तरुण पुन्हा जमुनियात आले. विवेक घरी नसल्याचे सांगून त्याच्या आईने त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केला. पण, काही वेळाने विवेक घरी परतताच, घरासमोरच त्यांनी त्याला पुन्हा धमकावले.
त्या चारही तरुणांनी “आयडी डिलीट कर, नाहीतर तुला ठार करू!” असे धमकावल्याने विवेक अधिकच मानसिक तणावात गेला. या धक्कादायक घटनेनंतर काही वेळातच विवेक घरातून बाहेर पडला आणि गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 27 मार्च रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. तिरोडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी या प्रकरणामागील गूढ वाढले आहे.
विवेकच्या फेसबुक आयडीत असे काय होते, की त्या चार तरुणांनी त्याला आयडी डिलीट करण्याची धमकी दिली? आयडी डिलीट न केल्यास ठार मारण्याचे कारण काय? त्याच्या मोबाइलमधील सिम कार्ड त्यांनी का नेले? ही आत्महत्या होती की त्या तरुणांनी काहीतरी कट रचला? पोलिस तपास सुरू, पण सत्य लपवले जात आहे, असे अनेक प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाले आहेत.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून अजूनही आरोपींवर ठोस कारवाई झालेली नाही. पोलीस निरीक्षक वानखेडे यांनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले आहे. तरी लोकांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे निष्पाप तरुणांचे जीवन धोक्यात येत आहे. जर वेळीच पोलिसांनी कठोर कारवाई केली असती, तर विवेक भैरमचा जीव वाचला असता! या घटनेने पालक आणि समाजाने तरुणांच्या ऑनलाईन सुरक्षिततेबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज अधोरेखित केली आहे.








