MLA’s controversial statement sparks anger in Buldhana : आमदार पडळकर यांच्याविरोधात बुलढाण्यातही संताप, ख्रिश्चन समाजाचा मोर्चा
Buldhana भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ख्रिश्चन समाजाविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाचा बुलढाणा येथे ख्रिश्चन समाजाने तीव्र निषेध नोंदवला. शहरातील ‘चर्च ऑफ नाझरीन’ येथून निघालेल्या शांततेच्या मोर्चात जिल्हाभरातील शेकडो ख्रिश्चन बांधव सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व ख्रिस्ती धर्मगुरु आणि समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी केले.
या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पक्षश्रेष्ठींनी आ. पडळकर यांना तातडीने समज द्यावी, त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. “धर्माचे राजकारण थांबवा”, “संविधानाचा सन्मान करा”, “सर्वधर्म समभाव जपा”, “पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा”, असे फलक हातात घेऊन आंदोलकांनी निषेध व्यक्त केला.
मोर्चात महिला आणि तरुणांची लक्षणीय उपस्थिती होती. रेव्हरंड विजय पलघामोल, सुहास गुर्जर, पास्टर हर्षनंद डोंगरदिवे, बोरघाटे, सोनारे, गायकवाड, शिंदे, पाटोळे, खंडारे, कांबळे आदींच्या मार्गदर्शनात मोर्चा शांततेत पार पडला. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी किरण पाटील यांना निवेदन सादर करून आ. पडळकर यांच्या विधानाविरोधात कडक कारवाईची मागणी केली.