Universities need to adapt changes in education and research field : राज्यपालांचा सल्ला; माफसूच्या पदवीदान समारंभात साधला संवाद
Nagpur नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण स्वीकारल्याने कृषी शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल घडून येतील. पण त्यासाठी विद्यापीठांनी तसेच प्राध्यापकांनी नवे बदल स्वीकारण्याची गरज आहे. शिक्षण आणि संशोधनातील बदलांशी जुळवून घेणे काळाची गरज आहे, असा सल्ला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी दिला. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या MAFSU बाराव्या पदवीदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी विद्यापीठाच्या प्र-कुलपती आणि पशुसंवर्धन, पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, प्रख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., माफसूचे कुलगुरु डॉ. नितीन पाटील आदींची उपस्थिती होती.
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी, रोजगार निर्मितीसाठी आणि लाखो लोकांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या कृषी संलग्न क्षेत्राचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी देश आणि समाजाच्या विकासात अनन्यसाधारण योगदान द्यावे. समाजाचीही आपल्याकडून अपेक्षा असते, असं आवाहनही राज्यपालांनी केले.
संयमाशिवाय यशाचा मार्ग प्रशस्त होत नाही. महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणे हा शेवट नाही. एक नवीन सुरुवात आहे. अधिक कठोर प्रसंगांचा येत्या काळात सामना करावा लागेल. शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतरची आव्हाने वेगळी असतात. त्याचा निश्चयाने सामना करण्याची गरज असल्याचे राज्यपाल म्हणाले.
पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘विद्यापीठाचे पदवीधर राज्यातील आणि देशातील प्राणी संपदा, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्य जैवविविधतेचे खरे संरक्षक आहेत. विज्ञानाचा प्रसार करण्याबरोबरच शेतकरी, ग्रामीण तरुण आणि महिलांसारख्या शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचवण्याची आहे. तुमच्या ज्ञानाने आणि शिकलेल्या कौशल्याने समाज आणि राज्यासाठी एक महत्वपूर्ण बलस्थान सिद्ध व्हावे,.’
Har Ghar Nal Se Jal : नागपूर विभागात 90.68 टक्के कुटुंबांना नळ जोडणी!
दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय, शेळीपालन व मेंढीपालन हे केवळ व्यवसाय नाहीत, तर ती कोट्यवधी लोकांसाठी जीवनाधार आहेत. जर आपण या क्षेत्राला बळकटी दिली, तर आपोआप ग्रामीण भारत मजबूत होईल, असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर म्हणाले.