Nitin Gadkari is India’s John F. Kennedy : एम्स नागपूरचा पहिला दीक्षांत समारंभ उत्साहात
Nagpur राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी एम्सच्या पदवीदान समारंभानंतर डॉक्टरांचे आणि व्यवस्थापनाचे कौतुक केले. त्याचवेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले, ‘देशाच्या विकासात चांगले रस्ते महत्त्वाची भूमिका बजावतात, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी म्हणायचे. गडकरींनी देशभरात केलेले काम बघून मी त्यांना ‘भारताचे जॉन एफ केनेडी’ मानतो.’
मिहान परिसरात आयोजित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या AIIMS पहिल्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे, खासदार श्यामकुमार बर्वे, एम्स नागपूरचे अध्यक्ष डॉ. अनंत पांढरे, कार्यकारी संचालक डॉ . प्रशांत जोशी आदींची उपस्थिती होती.
वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी जनुकीय आजार तसेच स्टेम सेल आणि वृद्धत्वाशी निगडीत आजारांवर अधिकाधिक संशोधन करण्याची गरज आहे. उपचार पद्धती त्या दिशेने आखल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राज्यपालांनी केले.
पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून पूर्वी केवळ दिल्लीत असलेले एम्स आता आता तामिळनाडू , झारखंड या राज्यासह नागपूरसह अनेक शहरात स्थापन झाले आहे. दिल्लीच्या एम्समध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना तसेच सहाय्यकांना निवासाची सोय मिळावी म्हणून शेल्टर हॉल सुद्धा निर्माण करण्यात आले आहेत. एम्स नागपूरच्या स्थापनेपासून सर्वात आधी पदवी घेऊन बाहेर पडलेली पहिली तुकडी म्हणून आपली या संस्थेच्या इतिहासात नोंद केली जाईल, असंही ते म्हणाले.
वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण कधीच थांबवू नये. त्यांनी या क्षेत्रातील नियतकालिकांचा अभ्यास करून यातील नव नवे संशोधन समजून घेत आपले ज्ञान अद्ययावत करावे असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.