by-elections-in2444-gram-panchayats-maharashtra : २८ एप्रिलला मतदान, ३,५९१ पदांसाठी चुरशीच्या लढती
Amravati राज्यातील २,४४४ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी जाहीर केला आहे. यात थेट सरपंचांची ४७१ पदे आणि सदस्यांची ३,१२० पदे रिक्त असून, एकूण ३,५९१ पदांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, संबंधित ग्रामपंचायतींमध्ये १७ मार्चपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज प्रक्रिया ७ ते १३ एप्रिलदरम्यान होणार आहे. अर्जांची छाननी १५ एप्रिलला होईल, तर १७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेता येणार असून त्याच दिवशी चिन्हांचे वाटप केले जाईल. मतदान २८ एप्रिल रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार असून, मतमोजणी २९ एप्रिल रोजी केली जाणार आहे.
३१ जानेवारी २०२६ पर्यंत रिक्त असलेल्या पदांसाठी अंतिम मतदार यादी २४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रचलित निकषांनुसार तत्काळ पोटनिवडणूक जाहीर होणे अपेक्षित होते; मात्र यावेळी सुमारे तीन आठवड्यांचा विलंब झाला. अखेर १७ मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने संबंधित ग्रामपंचायतींमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Kiran Mahalle : माजी महापौरांचे पुनर्वसन, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगावर नियुक्ती
जिल्हानिहाय पाहता ठाणे येथे ७८, पालघर १२७, रायगड १२७, रत्नागिरी ११४, सिंधुदुर्ग १०५, नाशिक १३३, धुळे ४७, जळगाव ८१, अहिल्यानगर ६४, नंदूरबार ६७, पुणे १५५, सोलापूर ३५, सातारा १३८, सांगली ८२, कोल्हापूर १००, छत्रपती संभाजीनगर ३२, बीड ८१, नांदेड ८२, धाराशिव २५, परभणी २०, जालना ३६, लातूर ६०, हिंगोली ९, अमरावती ६८, अकोला ७६, यवतमाळ ४७, वाशिम ५१, बुलढाणा ५९, नागपूर ८६, वर्धा २७, चंद्रपूर ३९, भंडारा ६५, गोंदिया ६९ आणि गडचिरोली जिल्ह्यात ५८ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणुका होणार आहेत.
या पोटनिवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार असून, स्थानिक स्तरावर चुरशीच्या लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे.








