Breaking

Grampanchayat Swdat : लोकांनीच मतदान करून सरपंचाला केले पायउतार!

Sarpanch steps down from direct public vote : किन्ही सवडतची चर्चा राज्यभर, बोंडे यांच्याविरोधात ठाम कौल

Buldhana ग्रामपंचायतीच्या कारभारावर असमाधान व्यक्त करत किन्ही सवडत ग्रामस्थांनी थेट सरपंचांविरोधात कौल देत एकप्रकारे लोकशाहीचा मजबूत प्रयोग घडवून आणला. थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच आकाश रामेश्वर बोंडे यांच्यावर जनतेनेच अविश्वास दर्शवत मोठ्या संख्येने मतदान करून त्यांना पदावरून पायउतार केले आहे.

सरपंच बोंडे यांच्यावर सात सदस्यांपैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठराव आणला होता. मात्र, सरपंच थेट जनतेतून निवडला गेल्याने फक्त सदस्यांचा ठराव अपुरा ठरतो. शासन नियमांनुसार अशा प्रकरणांमध्ये ग्रामसभा घेऊन जनतेच्या मतानेच निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले होते.

Mukhyamantri Saur Krishi Vahini Yojana : शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार, नागपूर टास्क फोर्सचा दावा

त्याअनुषंगाने तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी संतोष काकडे यांच्या नेतृत्वाखाली १६ जुलै रोजी सकाळी ९:३० वाजता ग्रामसभा घेण्यात आली. टोकन पद्धतीने पारदर्शक मतदान घेण्यात आले. एकूण ३६३ मतदारांनी हजेरी लावत सहभाग नोंदवला. यामध्ये २५८ मतदारांनी सरपंच बोंडे यांच्याविरोधात स्पष्ट कौल दिला, तर केवळ ९६ जणांनी त्यांना पाठिंबा दिला. ९ मतदार तटस्थ राहिले.

मतदानासाठी ग्रामपंचायत मतदार यादीतील नावाची व आधार ओळखीची तपासणी करण्यात आली. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात ही प्रक्रिया पार पडली. यावेळी महसूल व पंचायत समितीचे २८ अधिकारी-कर्मचारी, तसेच उदयनगर मंडळ अधिकारी सौ. सवडतकर, तलाठी डी. एस. गीते, ग्रा. पं. सचिव श्रीनिवास पाटील आदींची उपस्थिती होती. अमडापूर पोलिस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवला होता.

Nagpur Vidhan Bhavan : विधानभवनाचा विस्तार ठरला; शासकीय मुद्रणालय देणार जागा

या घटनेने ग्रामपंचायतीतील लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे. स्थानिक पातळीवरील असमाधान आणि कारभाराविषयीच्या तक्रारींचा थेट जनतेने निषेध नोंदवत एकप्रकारे लोकशाहीचा धडा दिला आहे. पुढील राजकीय घडामोडींमध्ये या ग्रामपंचायतीचे नेतृत्व कोणाकडे जाणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.