A team of ICMR scientists from Delhi and Chennai arriving Today : रुग्णांशी संवाद साधून माहिती संकलन करणार
Shegaon Khamgaon केस गळतीवर संशोधन करण्याच्या दृष्टीकोनातून केंद्रीय आयुष मंत्रालयाचे पथक जिल्हयात दाखल झाले आहे. त्यांनी पीडित गावांतील रुग्णांशी हितगुज करुन माहिती संकलीत करण्याचे काम सुरू केले आहे. तर भारतीय वैद्यकिय संशोधन परिषद अर्थात ICMR च्या दिल्ली आणि चेन्नईच्या शास्त्रज्ञांचे पथक आज 14 जानेवारीला दाखल होणार आहे.
बुलढाणा जिल्हयातील शेगांव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या पहुरजिरा, कालवड, कठोरा, भोनगांव, बोंडगांव यांसह 11 गांवामध्ये नागरीकांमध्ये केस गळतीची समस्या निर्माण झाली आहे. या गावांना 11 जानेवारी रोजी केंद्रीय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट दिली होती. बाधीत रुग्णांना धिर दिला. या विचित्र आजाराच्या संशोधनासाठी आयुष आणि भारतीय वैद्यकिय संशोधन परिषदेची टिमला आदेशीत केले होते. 13 जानेवारीला आयुष मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या प्रादेशिक होमीओपॅथी संशोधन संस्था नवी दिल्ली आणि केंद्रिय होमीओ परिषदेची शास्त्रज्ञाची टिम शेगांव तालुक्यात दाखल झाली आहे.
टीममध्ये युनानी होमीओपॅथी आणि आयुर्वेदीकचे तज्ञांचा समावेश आहे. डॉ. हिंकल कौर, डॉ. प्रियंका सुर्यवंशी, डॉ. तेजस्वीनी पाटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली केस गळती गावातील रुग्णांशी चर्चा करुन माहिती संकलीत करीत आहे. दरम्यान राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. भंडारी, सहाय्यक संचालक डॉ. आर.पी.पुलवार यांनी केस गळती गावांना भेटी देऊन रुग्णांशी संवाद साधला. या आजाराविषयी घाबरुन न जाता आरोग्य विभागाच्या पथकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.
ICMR चे पथक होणार दाखल
भारतीय वैद्यकिय संशोधन परिषद अर्थात ICMR दिल्ली आणि चेन्नई चे पथक 14 जानेवारी रोजी जिल्ह्यातील शेगांव येथे दाखल होणार आहे. या पथकामधील तज्ञ संशोधलक केस गळती भागातील बाधित रुग्णांशी संवाद साधून हा प्रकार कशामुळे झाला याचा शोध घेणार आहे. त्याचे मूळ शोधून प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने काम करणार आहे.
पथकामध्ये यांचा समावेश
या विशेष पथकामध्ये डॉ. मनोज मुऱ्हेकर (ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमियोलॉजी, चेन्नई) , डॉ. सोमेश गुप्ता (एम्स, नवी दिल्ली), डॉ. सुमित अग्रवाल (ICMR, नवी दिल्ली), डॉ. शीला गोडबोले (ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी, पुणे), डॉ. राज तिवारी (ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन एन्व्हायर्नमेंटल हेल्थ, भोपाळ), डॉ. सुचित कांबळे (ICMR-नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशनल व्हायरोलॉजी, पुणे) यांचा या विशेष पथकामध्ये यांचा समावेश आहे.