Congress loses a dedicated worker with the demise of Subhash Chavan : सरचिटणीस, उपाध्यक्ष व विधान परिषद सदस्य अशा विविध पदावर त्यांनी काम केले
Mumbai : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार सुभाष चव्हाण यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दु:खद व वेदनादायी आहे. सुभाष चव्हाण यांनी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसचा विचार सोडला नाही. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा एक समर्पित कार्यकर्ता हरपला आहे, अशी भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणतात की, सुभाष चव्हाण यांनी काँग्रेसचा विचार रुजवण्याचे महत्वाचे काम केले. प्रदेश काँग्रेसचे सचिव, सरचिटणीस, उपाध्यक्ष व विधान परिषद सदस्य अशा विविध पदांवर त्यांनी काम केले. पक्षाने त्यांना दिलेल्या जबाबदारीला न्याय देण्याचे काम त्यांनी केले.
सुभाष चव्हाण यांचा जन्म सिंधुदुर्ग, तालुका मालवण मधील धामापूर या गावचा. धामापूर गावचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज (२७ फेब्रुवारी) त्यांची प्राणज्योत मालवली.
त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक निष्ठावान कार्यकर्ता गमावला आहे. सुभाष चव्हाण यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चव्हाण कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.