Harshawardhan Sapkal : नरेंद्र मोदींच्या नावावर अनेक चमत्कार !

Multiple Wonders Attributed to Narendra Modi’s Name : शुभेच्छा देताना अनेक गोष्टींची आठवण करून द्यावीशी वाटते

Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी डिजीटल कॅमेऱ्याचा अविष्कार होण्यापूर्वीच डिजिटल कॅमेऱ्याने फोटो काढत होते, नालीच्या गॅसमधून चहा करण्याचा शोधही त्यांनीच लावला, रेल्वे स्टेशन सुरू होण्याच्या आधी ते बालपणी स्टेशनवर चहा विकत होते. असे एक ना अनेक चमत्कार नरेंद्र मोदी यांच्या नावावर आहेत, असा खोचक टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्षन सपकाळ यांनी मोदींना लगावला. अशा अनेक गोष्टींची आठवण त्यांना शुभेच्छा देताना करून द्यावीशी वाटते असेही सपकाळ म्हणाले.

अमरावती येथे सपकाळ यांनी आज (१७ सप्टेंबर) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, त्यांच्या जाहिराती ‘बोले तैसा चाले..’च्या आहेत, पण ते अगदी त्याच्या उलटं वागत आहेत. प्रत्येक माणसाच्या खात्यात १५ लाख रुपये देऊ, दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ, बेरोजगारी संपवून टाकू, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, आदी अनेक आश्वासने त्यांनी दिली होती. पण त्यांतील एकही पूर्ण केलेले नाही. त्यांनी दिलेल्या वचनांचे पालन करावे, अशी अपेक्षा आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करुया.

OBC Reservation : मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द न केल्यास तीव्र आंदोलन

केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जेव्हापासून भारतीय जनता पक्ष सत्तेत आला, तेव्हापासून सत्तेचे केंद्रीकरण सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या जॅकेटच्या खिशात सत्ता हवी आहे. संपूर्ण सत्ता एकाच माणसाला उपभोगायची आहे. सन २०२२ पासून त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ दिल्या नाहीत. याला त्यांचे केंद्रीयकृत राजकारणच जबाबदार आहे. स्थानिकच्या निवडणुका होऊ न देण्याचा घाट फडणवीस यांनीच घातला होता. काल (१६ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, तो फडणवीसांना दिलेली चपराक आहे, असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर कडवी टीका केली.