Congress state president will join the protest in Gadchiroli : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गडचिरोलीतील आंदोलनात सहभागी होणार
Mumbai : विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजपा युती सरकार सत्तेत आले. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला आहे. या मतचोरीची चौकशी केली जात नाही. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली असून लोकशाही व्यवस्थेवर घाला घातला जात आहे. म्हणून प्रदेश काँग्रेस उद्या गुरुवार दिनांक १२ जून रोजी राज्यभर मशाल मोर्चे काढून जनजागृती करणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ गडचिरोलीमधील आंदोलनात सहभागी होत आहेत.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले व भाजपा युतीचे पानीपत झाले होते. विधानसभा निवडणुकीत युती १०० जागाही जिंकू शकणार नाही अशी परिस्थिती असताना भाजपा युतीला प्रचंड बहुमताचा निकाल आला तो अनाकलनीय व अविश्वसनीय आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्केवारवरही संशय निर्माण झालेला आहे. मतदान संपल्यानंतर ५८ टक्के जाहीर केलेले मतदार दुसऱ्या दिवशी मात्र ६६.५ टक्के दाखवून तब्बल ७.८३ टक्क्यांची वाढ दाखवली. हा एक मोठा घोटाळा आहे. निवडणूक आयोगाने निष्पक्ष व पारदर्शी निवडणूका घेणे त्यांचे कर्तव्यच आहे पण त्यांच्यावरच संशयाचे ढग जमा होत असतील तर ते लोकशाही साठी घातक आहे.
लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी व निवडणूक आयोगावर निर्माण झालेले हे संशयाचे ढग दूर करण्यासाठी विधानसभा निवडणुकीतील ‘मॅच फिक्सिंगची’ चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ नेते, आजी माजी खासदार, आमदार, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत, अशी माहिती प्रदेश काँग्रेसकडून देण्यात आली आहे.








