maharashtra-congress-major-reshuffle-harshvardhan-sapkal-action-plan : महानगरपालिका-जिल्हा परिषदेतील पीछेहाटीचा सपकाळांकडून हिशोब; १० वर्षांपासून खुर्ची उबवणाऱ्या नेत्यांना डच्चू
Buldhana राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर आता काँग्रेस पक्ष कमालीचा आक्रमक झाला आहे. या निवडणुकीतील सुमार कामगिरीचा फटका पक्षातील जुन्या आणि निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बसणार असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनेत मोठ्या फेरबदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. प्रदीर्घ काळ एकाच पदावर ठाण मांडून बसलेल्या नेत्यांची आता गच्छंती होणार असून, नव्या दमाच्या आणि ‘लढाऊ’ कार्यकर्त्यांच्या हाती जिल्ह्याची सूत्रे दिली जाणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षपदावर १० वर्षांहून अधिक काळ एकच व्यक्ती कार्यरत आहे. यामुळे पक्षात मोठी ‘सुस्ती’ आली असून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पदभार स्वीकारल्यानंतर वर्षभर संयम पाळला, मात्र नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला अनेक बालेकिल्ल्यांत मात खावी लागल्याने त्यांनी आता ‘भाकरी फिरवण्याचा’ निर्णय घेतला आहे.
Sanjay Gaikwad : हद्दवाढीवरून राजकारण; आमदारांच्या जिव्हाळ्याच्या विषयाला विरोध कुणाचा?
संघटनात्मक फेरबदलाच्या या लाटेत प्रामुख्याने त्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे, जिथे काँग्रेसचा जनाधार लक्षणीयरीत्या घटला आहे. मुंबईतील ‘टिळक भवन’ येथे झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पराभवाचा जिल्हावार आढावा घेण्यात आला. ज्या जिल्हाध्यक्षांना स्वतःच्या मतदारसंघात पक्षाला आघाडी मिळवून देता आली नाही, त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे आव्हान पेलण्यासाठी आक्रमक आणि जनसंपर्क असलेल्या तरुण चेहऱ्यांची वर्णी लावून संघटना पुन्हा ‘चार्ज’ करण्याची रणनीती आखली जात आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः बुलढाणा जिल्ह्यातील असल्याने, या जिल्ह्यापासूनच मोठ्या बदलांना सुरुवात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यातील काँग्रेसच्या गडांना बसलेले तडे सांधण्यासाठी आणि जुन्या-नव्यांची सांगड घालण्यासाठी लवकरच धडाकेबाज निर्णय घेतले जातील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
केवळ पदे बदलून न थांबता, प्रत्येक पदाधिकाऱ्यासाठी आता ‘परफॉर्मन्स’चा निकष लावला जाणार आहे. जे नेते केवळ खुर्ची उबवण्याचे काम करत आहेत, त्यांना बाजूला सारून थेट फिल्डवर काम करणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. काँग्रेसच्या या संभाव्य ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे पक्षातील प्रस्थापित नेत्यांचे धाबे दणाणले आहेत.








