Agriculture Ministers indicative statement that farmers will get help : शेतकऱ्यांना मदत मिळणार कृषिमंत्र्यांचे सूचक वक्तव्य
Mumbai : महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीचा फटका सर्व जिल्ह्यांना बसला असून शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. अनेक भागांत शेतं पाण्याखाली गेली असून सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांसोबतच भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “राज्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहे. हवामान बदलामुळे एकाच वेळेस मुसळधार पाऊस होत असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत 30 जिल्ह्यातील 195 तालुक्यातील 654 महसूल मंडळांमध्ये 62 लाख 17 हजार 540 एकर क्षेत्रात शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन मदत करेल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
ladki bahin Yojana : लाडकी बहीण’ योजने संदर्भात सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान, विरोधकांकडून आणि शेतकरी संघटनांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना भरणे म्हणाले, “परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. अजूनही पाऊस सुरू आहे. सर्व परिस्थितीचा विचार करून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड, नागपूर आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
सततच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शासन मदतीची प्रतीक्षा करत आहेत. पंचनाम्याची प्रक्रिया जलद गतीने पार पाडून मदत पोहोचवली जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.