Holi is a festival of excitement; celebrate with colors, but be careful : नागरिकांना सावधानता बाळगण्याचा महावितरणचा सल्ला
Wardha : आनंद, उत्साह आणि उल्हास यांचा सण म्हणजे होळी. आपल्याकडे धुळवड व रंगपंचमी, अशा दोन्ही दिवशी रंगोत्सव जल्लोषात साजरा होतो. आयुष्यात आनंद देणाऱ्या रंगांना या दिवशी विशेष महत्त्व आहे. त्यांची उधळण केलीच पाहिजे, पण जरा जपून, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
आपली आणि इतरांचीही काळजी घेत रंग उधळले, तर रंगपंचमी नक्कीच आनंददायक होऊ शकेल. होळीच्या उत्सवाला विजेच्या अपघाताने गालबोट लागू नये, यासाठी होळी पेटविताना संभाव्य अपघात टाळण्याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याचेही महावितरणकडून कळवण्यात आले आहे. होळी पेटविताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रे नाहीत याची खातरजमा करून घेतली पाहिजे.
Shakti Peeth Highway : समृद्धी नागपुरातून तर शक्तीपीठ सुरू होणार सेवाग्राममधून
होळीच्या ज्वाळांनी वीजवाहिन्या वितळून जिवंत तार खाली पडून भीषण अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय अनेक ठिकाणी वीजवाहिन्या भूमिगत असल्याने, त्यापासून लांब अंतरावरच होळी पेटवावी. जेणेकरून होळीच्या उष्णतेपासून भूमिगत वीजवाहिन्या सुरक्षित राहतील. होळी पेटविताना शक्यतो मोकळ्या जागेचा वापर करावा. ट्रक किंवा इतर वाहनांतून होळी आणताना होळीचा स्पर्श रस्त्यालगतच्या वीजवाहिन्यांना होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. विजेचे अपघात हे प्राणघातक असल्याने एक चूकही प्राणांतिक अपघातास कारणीभूत ठरू शकते.
होळीच्या रात्री बऱ्याचदा रस्त्यावर होत असलेल्या हुल्लडबाजीचा फटका परिसरातील वीज ग्राहकांनाही होत असतो. बेधुंद वाहन चालकांमुळे अनेकदा वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्यासोबतच जीवित व वित्तहानी होण्याचा धोका असतो. याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यासोबतच नियोजित कार्यक्रमस्थळी वीज उपकरणांची योग्य तपासणी करून घ्या, उत्सवप्रिय आनंदावर विरजण पडू नये, अप्रिय घटना टाळून त्यांना होळीचा आनंद घेता यावा, यासाठी आयोजकांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता २४ तास सुरू असणारे नि:शुल्क क्रमांक १९१२, १९१२०, १८००२१२३४३५ किंवा १८००२३३३४३५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात आले आहे.
महावितरणने दिलेल्या सूचना..
– वीज वितरण यंत्रणेपासून लांब अंतरावर होळी पेटवा
– वीज वाहिन्या, वितरण रोहित्रांवर पाणी फेकू नका
– रंगीत पाणी वीज उपकरणांवर टाकू नका
– ओल्या हाताने वीज उपकरणांना स्पर्श करू नका
– वीज खांबांभोवती पाण्याचा निचरा करू नका
– वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या तत्काळ मदत कक्षाला संपर्क साधा