This is Maharashtra, not Uttar Pradesh; Hussain Dalwai is furious in Nagpur : मुस्लिम धर्मियसुद्धा महात्मा गांधींच्या शांततेच्या मार्गाने त्या आंदोलनाला प्रत्युत्तर देऊ शकले असते
Nagpur : सरकारने जाणीवपूर्वक काही लोकांना मदत करणे चुकीचे आहे. सकाळी ज्यांनी आंदोलन केले त्यांना काहीच नाही. ज्यांनी रात्री प्रतिक्रिया दिली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. आरोपीचे घर पाडताना सर्वोच्च न्यायालयाचे नियम पाळले गेले नाहीत. बुलडोजर उत्तर प्रदेशची पद्धत आहे. पण हा महाराष्ट्र आहे उत्तर प्रदेश नाही, असे म्हणत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व सत्य शोधन समितीचे सदस्य हुसेन दलवाई यांनी राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवला.
नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलताना हुसेन दलवाई म्हणाले, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. शिवाजी महाराजांनी मुस्लिम धर्मीयांना जवळ केले होते. महाराष्ट्रातील परंपरा जातीयवादी नाही, तर एकोप्याची आहे. यूपीचे द्वेषाचे राजकारण महाराष्ट्रात आणू नये. कुणाचे घर अनधिकृत असेल तर सुप्रीम कोर्टाच्या नियमात राहून कारवाई करावी. पण ती विशिष्ट सामाजासाठी असू नये. मुंबईत अनेक अनधिकृत बिल्डिंग आहेत, तेथेही बुलडोझर चालवणार का, याचे उत्तर महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी द्यावे.
Cotton Federation of India : कापूस खरेदी केंद्रात ५० कोटींची अफरातफर!
महाराष्ट्रात अशा पद्धतीचे वातावरण कधीही नव्हते. येथे नेहमीच दोन्ही धर्मांमध्ये एकोप्याचे नाते राहिलेले आहे. सर्व सणांमध्ये अनेक सणांमध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येतात. कोणत्याही गावातील मंदिर असो की मस्जीद, ती हिंदू मुस्लिमांची नसते. तर त्या गावाची असते. ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे दंगे होतात, त्या ठिकाणी मी जात असतो. दोन्ही समाजांत भाईचारा राहावा, शांतता राहावी, यासाठी प्रयत्न करतो, असे दलवाई यांनी सांगितले. आगामी गुढीपाडवा, राम नवमी सर्व सण शांततेत पार पडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सत्यशोधन समिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांनी तयार केली. मी या समितीचा सदस्य आहे. नागपुरात आल्यावर सामाजिक संस्थेचे एनजीओ यांच्यासह अनेक लोकांना, पत्रकारांना भेटलो. सध्या तेथे शांतता आहे, अशी माहिती मिळाली. महालमध्ये बजरंग दलाच्या आंदोलकांकडून हिरवी चादर जाळण्यात आली. त्यामुळे हा दंगा भडकला. अशा पद्धतीच्या आंदोलनात पोलीस हस्तक्षेप करत असतात. जाळपोळ करण्याला मज्जाव करतात. येथे पोलिसांनी चादर जाळायला कशी परवानगी दिली, हे कळले नाही. मुस्लिम धर्मियसुद्धा महात्मा गांधींच्या शांततेच्या मार्गाने त्या आंदोलनाला प्रत्युत्तर देऊ शकले असते, असेही हुसेन दलवाई यांनी नमूद केले.








