महायुतीवर ‘पाईप चोर, गुन्हेगारांना मत द्या’ असे सांगण्याची वेळ

If Gopinath Munde was there, picture would not seen, Eknath Khadse fierce criticism : गोपीनाथ मुंडे असते तर हे चित्र दिसले नसते, एकनाथ खडसे यांची जहाल टीका

Jalgaon: महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उडालेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, जे पाईप चोरीसारख्या प्रकरणांत अडकले आहेत किंवा तुरुंगातून निवडणूक लढवत आहेत, अशा उमेदवारांना मत देण्याचे आवाहन करण्याची वेळ महायुतीवर आली असल्याचा आरोप खडसेंनी केला आहे. हे चित्र पाहून जुने भाजपचे कार्यकर्ते आणि नेते हतबल झाले असून, जाणत्या नेत्यांना अशा उमेदवारांचा प्रचार करावा लागतोय, हे त्यांचे दुर्दैव असल्याचेही त्यांनी म्हटले.

आपल्या वक्तव्यात खडसे यांनी जुनी भाजप आणि सध्याची भाजप यातील फरक अधोरेखित करत माजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची आठवण करून दिली. आपण आयुष्याचा मोठा काळ भाजपमध्ये घालवला, मात्र त्या काळात एमआयएमसोबत युती कधीच झाली नव्हती, असे सांगत त्यांनी आजच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका बाजूला काँग्रेसवर टीका करायची आणि दुसऱ्या बाजूला त्याच काँग्रेससोबत युती करायची, अशी दुटप्पी भूमिका सध्या पाहायला मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Ladki bahin Yojana : लाडकी बहिण योजनेचे पैसे निवडणुकीनंतरच द्यावेत !

अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती, तर एका रात्रीत काँग्रेसचे नगरसेवक फोडून भाजपमध्ये घेण्याची उदाहरणे देत खडसे यांनी महापालिकांतील राजकारण पूर्णपणे संधीसाधूपणावर आधारित झाल्याचे सांगितले. मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्यातील अनेक महानगरपालिकांमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते कुठे गेले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भाजपने राज्यभरात शेकडो गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिल्याचा गंभीर आरोप करत, हे राजकारण महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार, असा प्रश्न खडसेंनी केला.

परिवर्तन करण्याची ताकद फक्त मतदारांकडे आहे आणि ही शेवटची संधी असल्याचे सांगत खडसे यांनी मतदारांना जागरूक राहण्याचे आवाहन केले. गुंडगर्दीच्या जोरावर नगरसेवक बिनविरोध निवडून येत आहेत, सर्वसामान्य माणसाला विकत घेण्याची भाषा सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. आयुष्यभर ज्यांना भाजपने विरोध केला, तेच आज भाजपमध्ये असून त्यांनाच उमेदवारी दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

जळगावमधील उदाहरण देताना खडसे यांनी आमदार सुरेश भोळे यांचा उल्लेख केला. ज्यांच्यावर पाईप चोरीचे आरोप करत पुरावे सादर केले गेले, गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली आणि रस्त्यावर आंदोलन झाले, त्याच उमेदवारांचा प्रचार आज आमदार सुरेश भोळे यांना करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. इतक्या वर्षांत असे फोडाफोडीचे आणि घाणेरडे राजकारण आपण कधी पाहिले नाही, असेही खडसे म्हणाले.

Municipal Elections : बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटेचा अखेर राजीनामा !

गोपीनाथ मुंडे यांच्या काळाची आठवण करून देताना खडसे यांनी सांगितले की, मुंडे यांनी गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्राची घोषणा दिली होती आणि दाऊदसारख्या गुंडांची दहशत मोडून काढली होती. आज मात्र गुन्हेगारांनाच मोठे केले जात असून, निवडून आल्यावर हे लोक गुंडगिरी आणि टेंडरबाजीच करतील, असा आरोप त्यांनी केला. महायुतीला महापालिका या मलिदा खाण्यासाठी हव्या आहेत, अशी टीका करत खडसे यांनी आपला हल्लाबोल अधिक तीव्र केला.