Two boats destroyed in Khadakpurna reservoir : अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई
Buldhana खडकपूर्णा नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर महसूल प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. ७ फेब्रुवारी रोजी तहसीलदारांच्या पथकाने खडकपूर्णा जलाशयात अवैध रेती उपसा करणाऱ्या दोन बोटी नष्ट केल्या.
तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे, आणि महसूल सेवक शरद काकडे व गजानन टेकाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. मेहुणाराजा आणि चिंचखेड शिवारातील चोखामेळा जलाशयाजवळ अवैध उत्खनन करताना संबंधित बोटी आढळून आल्या. महसूल प्रशासनाने तत्काळ जिलेटिनच्या साहाय्याने त्या नष्ट केल्या.
तहसील प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढेही बोटींच्या माध्यमातून अवैध रेती उपसा केल्यास जिल्हा स्तरीय शोध आणि बचाव पथकामार्फत कठोर कारवाई केली जाईल. तसेच जे शेतकरी अथवा नागरिक अवैध उत्खननाला मदत करतील, त्यांची सातबारा उताऱ्यावर नोंद घेतली जाईल.
अवैध रेती उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी गस्त पथक स्थापन करण्यात आले असून, महसूल विभागाच्या वतीने नियमित तपासणी केली जाईल, असे तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी सांगितले.
महसूल विभागाने रेतीचे अवैध उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईला गती दिली आहे. यापूर्वी तहसील प्रशासनाने रेती माफियांचे वाहतूक मार्ग बंद केले होते. खडकपूर्णा नदीच्या पात्रातून काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे, आणि महसूल विभागाने यावर तात्काळ नियंत्रण ठेवले आहे.