Action taken against illegal sand mining in Khadakpurna Dam : प्रशासनाची करडी नजर, पण रेती माफियांचे आव्हान कायम
Deulgaoraja : अवैध रेती उपशावर कठोर पावले उचलत प्रशासनाने देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरण परिसरात मोठी कारवाई केली. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे आणि तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोहिमेत दोन फायबर बोटी आणि एक इंजिनयुक्त बोट जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आली.
पावसाळ्याच्या तोंडावरही रेती माफियांचा दहशतखोर आणि बिनधास्त कारभार सुरू असल्याचे स्पष्ट होत असून, महसूल प्रशासनाची ही कारवाई धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, असे असूनही रेती तस्कर हे शासकीय कारवायांना भीक घालत नसल्याचे निरीक्षण राजकीय वर्तुळात व्यक्त केले जात आहे.
चिंचखेड (ता. देऊळगाव राजा) परिसरातील खडकपूर्णा धरण क्षेत्रात अवैध उपशाची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई राबविण्यात आली. बोटी अर्धवट पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळल्या. स्थानिक महसूल यंत्रणेच्या परिश्रमांमुळे या बोटी नष्ट करण्यात यश आले.या मोहिमेत मंडळ अधिकारी विजय हिरवे, ग्राम महसूल अधिकारी बुरकुल, वायाळ, शेटे यांसह बचाव व शोध पथक सक्रिय सहभागी झाले.
राज्य शासनाने अवैध रेती उपशावर आळा घालण्यासाठी नियमावली आखली असली, तरी स्थानिक पातळीवरील अंमलबजावणी अजूनही तोकडीच असल्याचे वास्तव या घटनेतून अधोरेखित होते. महसूल यंत्रणांच्या सततच्या कारवायांनंतरही माफियांना राजकीय अभय मिळत असल्याचा आरोप विरोधकांनी अनेकदा केला आहे.
Praveen Gaikwad : संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं
या पार्श्वभूमीवर, ही कारवाई निव्वळ तात्कालिक उपाय ठरणार की अवैध रेती उपशाविरुद्ध दीर्घकालीन धोरणात्मक लढा सुरू होणार, याकडे आता राज्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.