Inadequate manpower, still tops in cracking molestation cases : चोरी करणारे, दरोडा टाकणारे मात्र मोकाट
Wardha वर्धा जिल्ह्यात पोलीस विभागामध्ये मनुष्यबळाचा प्रश्न कायम आहे. तरीही अपुऱ्या मनुष्यबळात विनयभंग व खुनाच्या गुन्ह्याxचा तपास लावण्यात जिल्ह्यातील पोलीस अव्वल आहेत. खून व विनयभंगाचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण जवळपास १०० टक्के आहे. मात्र चोरी करणारे, दरोडा टाकणारे अद्याप मोकाटच फिरत आहे.
२०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये गुन्ह्यांचा आलेख कमी झाला. दाखल गुन्ह्यांपैकी १ हजार ४०० गुन्हे उघड करण्यात पोलिस विभागाला यश आले आहे. जिल्हा पोलिसांनी अनेक गंभीर गुन्ह्यांसह इतर गुन्ह्यांचा सुतावरून स्वर्ग गाठत छडा लावला आहे. यामध्ये खून व विनयभंगाचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाण १०० टक्के आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कायमच आहे. जिल्ह्यात दारूबंदी असतानाही मोठ्या प्रमाणात दारू विकली जाते; मात्र दाखल गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरी, घरफोडी, इतर चोऱ्यांचे प्रमाण उघड होण्याचे प्रमाण कमी आहे. परंतु शरीराविरुद्ध व इतर गंभीर गुन्हे उघड होण्याचे प्रमाण ७० टक्के असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, पोलिस दलात अपुरे मनुष्यबळ असल्यानेही तपासावर परिणाम होत आहे. त्यातच सण, उत्सव, निवडणूक, व्हीआयपी बंदोबस्तासह इतर अनेक कामे पोलिसांना असतात. त्याचा परिणामही तपासावर होतो. असे असले तरी पोलिसांकडून गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत प्रयत्न केले जातात.
सन २०२४ मध्ये जिल्ह्यात भाग १ ते ६ असे दीड हजारांवर गुन्हे दाखल आहेत. यापैकी जवळपाच सर्वच गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरून सुरू असलेली प्रतिबंधित गुटखा तस्करी पोलिसांनी शोधून काढली. एलसीबीच्या पोलिसांनी आरोपींना अटक करून प्रतिबंधित तंबाखू जप्त केली.
गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत झाली. त्यामुळे गुन्हे उकलचा टक्का वाढत आहे. आता बातमीदारांपेक्षाही तंत्रज्ञानाची अधिक मदत घेतली जात आहे. काही गुन्हे हे तांत्रिकदृष्ट्या दाखल झालेले असतात, तर काही गुन्हे खोटे असतात. ते उघड करण्यात पोलिसांना अपयश येते.
तसेच काही अनोळखी मृतदेहांसह इतर गुन्ह्यांचा तपास लागत नाही. सर्वांत जास्त गुन्हे उघड न होण्याचे प्रमाण चोरी, घरफोडी या गुन्ह्यांचे आहे. पोलिसांनी एक गुन्हा उघड केल्यावर चोरटे न्यायालयातून जामिनावर बाहेर येतात. पुन्हा तसाच गुन्हा वारंवार करत असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे चोरटे सावध राहतात.