Nagpur residents respond to Devendra Fadnavis and Nitin Gadkari’s appeal : हजारो नागपूरकरांनी एकत्र राष्ट्रगीत गाऊन रचला इतिहास
Nagpur : आज १५ ऑगस्ट रोजी हजारो नागपूरकर फुटाळा तलावावर एकत्र जमले आणि स्वातंत्र्य दिनाचा ‘उत्सव’ साजरा केला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सकाळी ठीक १०:३० वाजता पार पडलेला ‘सामूहिक राष्ट्रगान’ हा क्षण होता, जेव्हा उपस्थित हजारो नागरिकांनी सात राज्यांमधील ४५० पेक्षा जास्त ठिकाणांहून सहभागी झालेल्या लाखो भारतीयांसोबत एकाच वेळी, एकाच सुरात राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रीय एकतेचे दर्शन घडवले.
‘एक वादळ भारताचं’ या सामाजिक संघटनेच्यावतीने हे आयोजन करण्यात आले होते. “सुट्टी नव्हे, उत्सव साजरा करूया!” हा संदेश घेऊन आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला नागपूरकरांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सकाळपासूनच फुटाळा तलाव परिसर नागरिकांच्या गर्दीने आणि देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता ढोलताशा पथकांच्या ऊर्जापूर्ण गजराने झाली. यानंतर विवेकानंद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शानदार स्काउट-गाईड परेड आणि लेझीम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. लालसिंग स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी तिरंग्यासह स्केटिंगची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली, तर शिवशक्ती आखाड्याच्या कलाकारांनी मर्दानी खेळांचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असलेला २२ फुटांचा भव्य राष्ट्रध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
School ID scam : शालार्थ आयटी घोटाळ्यातील फरार निलेश वाघमारेला अटक !
‘एक वादळ भारताचं’चे मुख्य संयोजक वैभव शिंदे म्हणाले, “आज नागपूरने दाखवून दिले की, राष्ट्रप्रेम हे प्रत्येक नागरिकाच्या हृदयात जिवंत आहे. हा केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर एका विचाराचा विजय होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून नागपूरकरांनी हा दिवस अविस्मरणीय बनवला.”
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी चळवळीतील तरुणांनी योगदान दिले. तसेच नागपूर महानगरपालिका आयुक्त व नागपूर पोलीस प्रशासन तसेच महानगरपालिकेचे क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी यांचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे हा उत्सव शांततेत आणि यशस्वीरीत्या पार पडल्याचे शिंदे यांनी सांगितले.








