Slaughterhouses closed on Independence Day Controversy over decision : स्वातंत्र्यदिनी कत्तलखाने बंद करण्याच्या निर्णयावरून वादंग
Mumbai : स्वातंत्र्य दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्यातील काही महापालिकांनी घेतला असून, यावरून सध्या राजकीय वादंग पेटले आहे. कल्याण – डोंबिवली, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि अमरावती महापालिकांनी हा निर्णय जाहीर केला आहे. विरोधकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत “लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये, हे देखील सरकार ठरवत आहे” अशी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड या विषयावर आक्रमक झाले आहेत.
भाजपने मात्र या टीकेला उत्तर देताना स्पष्ट केले की हा निर्णय महायुती सरकारचा नसून १२ मे १९८८ रोजी काँग्रेस सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी घेतलेला आहे. त्यानंतर महिनाभरातच मुख्यमंत्री झालेल्या शरद पवारांच्या कार्यकाळात हा निर्णय प्रथमच अंमलात आला होता.
Jaya Vs Kangana : अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहात, लाज बाळगा !
महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ ऑगस्ट रोजी मांसाहारावर बंदी योग्य नसल्याचे मत व्यक्त केले होते. यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समाज माध्यमावर प्रतिक्रिया देताना म्हटले “अजित पवारांना देखील माहिती असेल की हा निर्णय महायुती सरकारचा नाही. तरीही त्यांनी विरोध दर्शवला, हे आश्चर्यकारक आहे.”
केशव उपाध्ये यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांना थेट प्रश्न विचारला “१५ ऑगस्ट कत्तलखाना बंदी साठी शरद पवारांचा निषेध करणार का? विरोध करणार का? त्यांना जाब विचारणार का? हा खरा प्रश्न आहे.”
Administration : प्रशासकीय रचना, कामकाजाच्या प्राधान्यक्रमात बदल !
ते पुढे म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या काळातही १५ ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवले गेले होते. तेव्हा आव्हाड आणि ठाकरे मंत्री होते, पण त्यांनी एक शब्दही बोलला नाही. आता मात्र पक्ष आणि सत्ता गेल्यामुळे सरकारच्या प्रत्येक कृतीला विरोध करण्याची सवय झाली आहे. महायुती सरकारने सूर्य पूर्वेला उगवतो म्हटले तरी हे त्याला विरोध करतील.”भाजपच्या या प्रत्युत्तरानंतर कत्तलखाना बंदीचा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.