Metro will run till late for the cricket match : भारत-इंग्लंड सामन्याच्या उत्साहात पडली भर
Nagpur क्रिकेट चाहत्यांच्या सोयीसाठी ६ फेब्रुवारी रोजी मेट्रोच्या फेऱ्यांत वाढ करण्यात आली आहे. क्रिकेट चाहत्यांना सहज घरी पोहोचता यावे यासाठी मेट्रोच्या फेऱ्या ११.३० वाजेपर्यंत सुरू राहतील, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.
नियमित मेट्रोच्या फेऱ्या सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत सुरू राहतात. भारत आणि इंग्लंड यांच्यात ६ फेब्रुवारीला जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर वनडे सामना खेळला जाणार आहे. त्यामुळे महामेट्रोने वेळात बदल केला आहे. शेवटची ट्रेन खापरी मेट्रो स्थानकावरून ११.३० वाजता सुटेल.
खापरीहून प्रवासी ऑटोमोटिव्ह स्क्वेअरपर्यंत प्रवास करू शकतील किंवा सीताबर्डी इंटरचेंजवर ट्रेन बदलून अॅक्वा लाइनच्या कोणत्याही दिशेने प्रवास करू शकतील. मेट्रो दर १० मिनिटांच्या अंतराने दिवसभर धावेल. व्हीसीए जामठा स्टेडियम न्यू एअरपोर्ट मेट्रो स्टेशनपासून ७ किलोमीटर आणि खापरी मेट्रो स्टेशनपासून ६ किलोमीटर अंतरावर आहे.
जामठा स्टेडियम आणि परत येण्यासाठी न्यू एअरपोर्ट स्टेशनवर एनएमसीच्या बसेस उपलब्ध असतील. क्रिकेट चाहत्यांनी सामन्यानंतर होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीतून सुटका करून घेण्यासाठी मेट्रो सेवांचा लाभ घ्यावे, असे आवाहन महामेट्रोकडून करण्यात आले.
मिनिटांतच संपली तिकीटे
क्रिकेट सामन्याची तिकीटे ऑनलाईन उपलब्ध होताच अवघ्या काही मिनिटांत संपली. त्यामुळे अनेक चाहत्यांची निराशा झाली. तर यामुळे तिकिटांचा काळा बाजार सुरू झाला. मंगळवारी संध्याकाळी तर जामठा येथील व्हिसीए स्टेडियमच्या बाहेरच काही लोक ब्लॅकमध्ये तिकीट विक्री करत होते. विशेष म्हणजे काही मिनिटांतच अख्ख्या स्टेडियमची तिकीटे विकली जावी आणि त्यानंतर हजारो रुपयांना ब्लॅकमध्ये उपलब्ध व्हावी. याचा आता तपास सुरू झाला आहे. हे रॅकेट वाढविण्यात कुणाचा सहभाग आहे, याचाही शोध घेतला जात आहे.