Indian Prime Minister Narendra Modi’s speech should have been a warning to America : ‘अमेरिकेपुढे आम्ही झुकणार नाही’, हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं !
Nagpur : नरेंद्र मोदी निवडणुकांपूर्वी, सत्तेत येण्यापूर्वी ज्या ताकदीने बोलले होते, त्याच ताकदीचे त्यांचे कालचे (१२ मे) भाषण असायला हवे होते, अशी तमाम भारतीयांची अपेक्षा होती. तसे न घडल्याने भारत अमेरिकेपुढे का झुकला, हा प्रश्न देशभरातून विचारला जात आहे. जनतेमध्ये विश्वासघात केल्याची भावना वाढीस लागली आहे, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार यांनी आज (१३ मे) नागपुरात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, आपले सैन्य ताकदवर असताना कुणासमोर झुकण्याची काय गरज होती? ‘अमेरिकेपुढे आम्ही झुकणार नाही’, हे वाक्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात आलं असतं, तर अधिक बरं वाटलं असतं. पंतप्रधान भाषणात वारंवार पाकिस्तानचं नाव घेत होते. त्या चिल्लर देशाला इतका भाव देण्याची गरज काय होती? खरं तर कालचं भाषण पाकिस्तानला नव्हे तर अमेरिकेला इशारा देणारं असायला हवं होतं.
युद्धबंदीनंतर पहिले ट्र्म्पचं भाषण झालं. त्यानंतर आमच्या देशाच्या पंतप्रधानांचं भाषण झालं. सैन्याला पूर्ण अधिकार दिलेच होते, त्यावर पंतप्रधानांनी ठाम रहायला पाहिजे होतं. पाकिस्तानात आणखी घुसायला पाहिजे. कारण आमचे सैन्य ताकदवर आहे. काल पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात त्यांची हतबलता दिसत होती, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.