Hundreds of flights across the country, including 42 in Pune, cancelled : देशभरात शेकडो उड्डाणं तर पुण्यात ४२ फ्लाइट्स रद्द
Mumbai: देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो संकटातून बाहेर पडण्याचे नाव घेत नाही आहे. मागील चार दिवसांपासून उड्डाणे रद्द होण्याचा तगडा फटका बसल्यानंतर आजही मोठ्या प्रमाणात विमान उड्डाण रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. पुण्यातील विमानतळावर दिवसभरातील एकूण ४२ उड्डाणं रद्द करण्यात आली असल्याचे अधिकृत माहितीने स्पष्ट केले आहे. यामध्ये पुण्यात येणारी १४ आणि पुण्याहून विविध शहरांकडे जाणारी २८ उड्डाणांचा समावेश आहे. काही उड्डाणं आधी विलंबाने सुटतील अशी माहिती देण्यात आली होती मात्र नंतर थेट रद्द करणाची घोषणा करण्यात आली, त्यामुळे प्रवाशांची मोठी अडचण झाली. देशभरात आज अंदाजे ४५० हून अधिक इंडिगो उड्डाणांवर परिणाम झाल्याची नोंद आहे.
इंडिगोकडून रद्द करणाचे कारण म्हणून तांत्रिक अडचणी, क्रूची कमतरता आणि शेड्युलिंगमध्ये झालेला गोंधळ असा संदर्भ देण्यात आला आहे. कंपनीचे सीईओ पीटर एल्बर्स यांनी प्रवाशांची माफी मागत १० ते १५ डिसेंबरदरम्यान परिस्थिती सामान्य होईल अशी अपेक्षा व्यक्त केली असली तरी सध्या विमानतळांवर गोंधळाची परिस्थिती कायम आहे. उड्डाण रद्द झाल्यामुळे पर्यायी प्रवासाचा खर्च प्रवाशांच्या खांद्यावर पडत असून अनेकांना परतावा मिळण्यासाठीही चकरा माराव्या लागत आहेत. काही विमानतळांवर तिकीट रद्द करण्यासाठी काल प्रचंड गर्दी पाहायला मिळाली होती, परंतु आज प्रवाशांनी फ्लाइट माहितीबाबत अनिश्चिततेमुळे इंडिगो काउंटरवर गर्दी टाळल्याचे दिसून आले.
इंडिगोच्या सेवेतील ढासळामुळे इतर विमान कंपन्यांच्या तिकिट दरांनी गगनाला भिडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अचानक वाढलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर नागपूर–मुंबई, नागपूर–दिल्ली, नागपूर–पुणे, नागपूर–गोवा, नागपूर–बेंगळुरू आणि नागपूर–हैदराबाद अशा मार्गांवरील तिकीट दर २५ ते ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचले असल्याने प्रवाशांचा आक्रोश वाढला आहे. प्रवाशांनी माध्यमांशी बोलताना “विमान कंपन्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन लूट करत आहेत” असा थेट आरोप केला. रायपूर–नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट दर ४० ते ४५ हजार असल्याचे सांगत संताप व्यक्त केला.
Indu Mill Smarak : डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदू मिल स्मारकाचे लोकार्पण पुढच्या वर्षी !
इंडिगोची सेवा ठप्प झाल्याने सरकारी यंत्रणा हालचालीला लागली असून केंद्र सरकारने संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. नागरी उड्डाण मंत्रालयाने २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करून उड्डाण संचालन, प्रवासी संख्या, दरवाढ आणि तक्रारींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रेल्वेनेही अचानक वाढलेल्या प्रवासी भाराचा विचार करून काही विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, स्पाइसजेटनेही मदतीचा हात पुढे करत परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त १०० उड्डाणे चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
एकूण परिस्थितीकडे पाहता इंडिगोची उड्डाण सेवा केव्हा नियमित होणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. प्रवासी मात्र अजूनही अनिश्चिततेत असून पुढील काही दिवस हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
____








