Will resolve all problems in Pusad MIDC : राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा शब्द
Yavatmal पुसद येथील एमआयडीसीला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी एमआयडीसीतील विविध समस्यांचा आढावा घेतला. या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात पुसद एमआयडीसीत एकही समस्या उरणार नाही, असा शब्द त्यांनी दिला.
आढावा बैठकीला उद्योजक व अधिकारी उपस्थित होते. उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा स्थानिक उद्योजकांतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री नाईक यांनी उद्योजक आणि अधिकारी यांच्या समस्या आणि नवीन सूचना समजून घेतल्या. उद्योजकांनी पुसद एमआयडीसीतील रस्ते, पथदिवे, ड्रेनेज, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, सुरक्षा, स्वच्छता, आदी पायाभूत सुविधांविषयी आपल्या समस्या मांडल्या.
तसेच वित्तीय संस्था म्हणजेच बँकांच्या असलेल्या उदासीन प्रवृत्तीबाबत काही उद्योजकांनी आपली नाराजी व्यक्त केली. शासनातर्फे उद्योगासाठी अतिशय उपयुक्त मदत करणाऱ्या योजना अस्तित्वात आहेत; पण त्या पूर्णपणे उद्योजकांपर्यंत पोहोचत नाहीत. मालाची आयात-निर्यात, भूखंड वितरण व इतर समस्या, आदी विषयाशी निगडित कार्यशाळा पुसद येथे घेण्यात यावी, अशी मागणी उद्योजकांनी केली.
मोठे उद्योग पुसद एमआयडीसीमध्ये आल्यास व सद्यःस्थितीत सुरू असलेल्या उद्योगांना आर्थिक सुबत्ता आणि ऊर्जितावस्था आल्यास नवीन अनेक उद्योग एमआयडीसीकडे आकर्षित होतील, अशी अपेक्षा उद्योजकांनी व्यक्त केली. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश दिले.
पुसद एमआयडीसी आदर्श करण्यासाठी आपला कायम पुढाकार राहील, असे आश्वासन राज्यमंत्री नाईक यांनी आढावा बैठकीत दिले. यावेळी पुसद एमआयडीसीमधील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.