International Environment Conference will be held in Chandrapur : आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलनाची सुरूवात करणार चंद्रपूरमधून
Chandrapur : ज्या आईने आपल्याला जन्म दिला, त्या आईचे कर्ज कधीच फेडता येत नाही. आईप्रमाणेच या वसुंधरेनेही आपल्याला भरभरून दिलं आहे. या वसुंधरेचे कर्ज आपण फेडू शकतो, असे राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले. वसुंधरेचे कर्ज फेडण्याचा उपायही त्यांनी सांगितला.
चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मूल येथे तृतीय राष्ट्रीय पर्यावरण संमेलन 2025 चं उद्घाटन रविवारी (५ जानेवारी) झालं. यावेळी आमदार मुनगंटीवार बोलत होते. ते म्हणाले, गेल्या महिन्यात एक जण मला भेटायला दिल्लीतून आला होता. त्याच्यासोबत एक बॉक्स होता. त्याच्यात एअर प्युरीफायर होतं. मी विचारलं तर तो म्हणाला की ‘दिल्लीत येवढं प्रदूषण आहे की ताईत जसा गळ्यात घातला जातो, तसं हे प्युरीफायर तेथे गळ्यात घालावं लागतं. तेव्हा कुठे थोडीफार शुद्ध हवा ऑक्सीजन मिळतो.’ दिल्लीसारखी परिस्थिती येऊ नये, यासाठी आपण जागरूक असलं पाहिजे, असं मुनगंटीवार म्हणाले.
CDCC Bank Chandrapur : नोकर भरतीतील आरक्षणासाठी मुनगंटीवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना कॉल !
संमेलनाचे महत्व..
प्रत्येकाने मनावर घेतलं तरच पर्यावरण उत्तम राहू शकते. भविष्यात ऑक्सीजन विकत घेण्याची वेळ आली तर परिस्थिती अवघड होणार आहे. त्यामुळे आपल्याला पाहिजे तेवढ्या ऑक्सीजनपुरती तरी झाडं लावावी, असे आवाहन करत मुनगंटीवार यांनी संमेलनाचे महत्व विषद केले. ते म्हणाले, पर्यावरणाचं रक्षण करणाऱ्याला शोधू नका. तर आरशात पहा. कारण सुरूवात स्वतःपासून करावी लागते. ‘जीवन’ मधील ‘वन’ जर काढून टाकलं, तर त्या जिवनाला अर्थ राहात नाही. त्यामुळे जिवनातील वनांचे महत्व ओळखा, असं आवाहन त्यांनी केलं.
आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलन..
आंतरराष्ट्रीय पर्यावरण संमेलन १६, १७ व १८ जानेवारीला चंद्रपूरला आयोजित केलं आहे. तीन दिवसाचं आंतरराष्ट्रीय संमेलन घेतो आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरची सुरूवात चंद्रपुरातून करतो आहे. कारण चंद्रपुरचा C चॅम्पीयनचा C झाला पाहिजे. माती, वायु, पाणी प्रदूषण झाले यासोबतच मनाचंही प्रदूषण झालं आहे. मनाचे पर्यावरण बिघडते तेव्हा विचारही बदलतात. त्यामुळे या प्रदुषणावर ‘लक्ष्य’ ठरवण्याची आवश्यकता आहे. सखोल चिंतन होण्याची आवश्यकता आहे.
CM Devendra Fadnavis : महारेरा कायद्यामुळे ग्राहकांना स्वरक्षण !
भूमिकेला समर्थन..
शेकडो लोक आहेत, जे घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजतात. असे जेवढेही कार्यकर्ते आहेत, त्यांना एकत्र केलं पाहिजे. फक्त संमेलन घेऊन थांबता कामा नये. तर वर्षभराचे नियोजन करून काम केलं पाहिजे. पोलंडमध्ये जेव्हा परिषद झाली. तेव्हा माझ्या पुस्तकाचा विचार त्यांनी केला. तेलंगणाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक जेव्हा माझे पुस्तक घेऊन जातात, तेव्हा मला आनंद होतो. .
संयुक्त राष्ट्र संघासोबत भारत म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे. २०५० पर्यंत लोकसंख्या वेगाने वाढेल. अन् अन्नधान्य ३० टक्के कमी होईल. त्यावेळी परिस्थिती अत्यंत गंभीर होणार आहे. ती स्थिती उद्भवू द्यायची नसेल तर पर्यावरणासाठी मिशन मोडवर काम करावे लागेल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.