iran-israel-war-impact-india-oil-fertilizer-onion-banana-basmati-export-crisis : तेल, खत आयात धोक्यात, कांदा-केळी व बासमती निर्यात अडथळ्यात
New Delhi : पश्चिम आशियात सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाचे आर्थिक पडसाद आता भारतात प्रकर्षाने उमटू लागले आहेत. युद्धजन्य तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत होत असून त्याचा थेट परिणाम भारताच्या तेल आयातीवर, खतांच्या उपलब्धतेवर तसेच कृषीमालाच्या निर्यातीवर होत असल्याचे चित्र आहे. परिस्थिती दीर्घकाळ राहिल्यास महागाईचा दबाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
भारताचा मोठा सागरी व्यापार होर्मुझची सामुद्रधुनी मार्गे होतो. या सामुद्रधुनीतून कच्च्या तेलाची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. सध्या या मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने वाहतूक खर्च आणि विमा प्रीमियम वाढण्याची शक्यता आहे. परिणामी पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजीच्या दरांवर वाढीचा दबाव येऊ शकतो. भारताच्या सागरी व्यापारातील सुमारे निम्मा हिस्सा या मार्गावर अवलंबून असल्याने परिस्थिती गंभीर मानली जात आहे.
Sudhir mungantiwar : स्थानिकांवर अन्याय खपवून घेतला जाणार नाही, मुनगंटीवारांचा वेकोली प्रशासनाला दम
इराणमधील चाबहार या बंदराच्या माध्यमातून भारताने पश्चिम आशियात व्यापारवृद्धीची दिशा ठरवली आहे. मात्र सध्याच्या तणावामुळे या प्रकल्पाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रशिया आणि मध्य आशियाई देशांशी जोडणाऱ्या या मार्गावरही अनिश्चिततेचे सावट आहे.
खतांच्या बाबतीतही चिंता वाढली आहे. इराण हा रासायनिक खतांचा महत्त्वाचा पुरवठादार देश असल्याने आयात अडथळली तर देशांतर्गत दरात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते, असे व्यापार क्षेत्रातील सूत्रांचे म्हणणे आहे. याचा थेट परिणाम खरीप हंगामावर होण्याची शक्यता आहे. सुकामेवा, खजूर, बदाम आणि पिस्ता यांसारख्या वस्तूंच्या आयातीतही तणाव दिसून येत असून मुंबईतील घाऊक बाजारात दरवाढ नोंदवली जात आहे.
निर्यातीच्या आघाडीवर परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली आहे. पश्चिम आशियात जाणारे कांद्याचे सुमारे १६० कंटेनर मुंबई बंदरात अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. निर्यात मंदावल्यास देशांतर्गत बाजारात आवक वाढून दर घसरण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातून आखाती देशांकडे होणारी केळी निर्यातही ठप्प झाली असून दरात मोठी घट झाल्याचे व्यापारी सांगतात. नाशवंत माल असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान वाढण्याची भीती आहे. बासमती तांदळाच्या निर्यातीवरही परिणाम झाला असून पंजाब आणि हरियाणातील उत्पादक चिंतेत आहेत.
Property tax exemption : मोठा निर्णय! मुंबईत 700 चौ. फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी
दरम्यान जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायांकडे वळल्याने सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. शेअर बाजारातही मोठी घसरण नोंदवली गेली असून निर्देशांकांमध्ये शेकडो अंकांची पडझड दिसून आली. पश्चिम आशियातील संघर्ष केवळ भौगोलिक मर्यादेत न राहता जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करत असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. परिस्थिती लवकर सुरळीत न झाल्यास भारतातील महागाई, शेतकरी उत्पन्न आणि औद्योगिक खर्च यांवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.








