Vijay Pandhare makes serious allegations against Ajit Pawar : विजय पांढरे यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप
Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणात जलसिंचन घोटाळ्याचे भूत पुन्हा जागे झाले आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राहिलेले विजय पांढरे यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत नवा वाद निर्माण केला आहे. नुकत्याच सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत पांढरे यांनी अजित पवार हे सिंचन घोटाळ्याचे खरे सूत्रधार असल्याचे म्हटले.
पांढरे यांच्या मते, त्या काळात उच्चस्तरीय चौकशी नेमून योग्य कारवाई झाली असती तर अजित पवार यांना तुरुंगवास भोगावा लागला असता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांचे पाप झाकले आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठिंबा दिला, असा आरोप त्यांनी केला.
विजय पांढरे यांनी सांगितले की, जलसिंचन खात्यातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी सरकारने माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. पण अहवालात गोष्टी स्पष्ट न मांडल्याने सरकारला अजित पवार यांना वाचवण्याची संधी मिळाली. तरीही त्या अहवालात भ्रष्टाचाराबाबत पुरेशी माहिती असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “चितळे यांनी स्वतःच्या एका मुलाखतीत म्हटले होते की, माझ्या अहवालानुसार कारवाई केली तर अजित पवार दोन दिवसांत जेलमध्ये जातील,” असे पांढरे यांनी दावा केला.
Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उद्धवसेनेत मंथन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूर खंडपीठात अजित पवार यांना क्लीनचिट दिल्याचे लेखी सादर केले असले तरी न्यायालयाने अद्याप ती क्लीनचिट मान्य केलेली नाही. या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू नसल्यामुळे खरेच कारवाई होणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
“जर मुख्यमंत्री फडणवीसांनी खरी कारवाई केली असती, तर अजित पवार दोन दिवसांत तुरुंगात गेले असते,” असे स्पष्ट वक्तव्य करत विजय पांढरे यांनी पुन्हा सिंचन घोटाळ्याचा मुद्दा तापवला आहे. त्यामुळे दादांना म्हणजेच अजित पवारांना या जुन्या आरोपांचे भूत पुन्हा सतावणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
_____