Breaking

Jai Gujarat controversy : चूक नाही – मुख्यमंत्री, केम छो साहेब- आव्हाड, हा मंत्रिमंडळात कसा? – राऊत

Eknath Shindes Jai Gujarat! slogan sparks controversy ; एकनाथ शिंदे यांचा ‘ जय गुजरात !’ नाऱ्याचा वाद चिघळला

Mumbai ; केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा उपस्थितीत पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ जय गुजरात’ असा उल्लेख केला. यावरून राज्यात वाद पेटला आहे. मुख्यमंत्र्यांनी शिंदेंची बाजू घेत त्यांचे काही चुकले नाही असे म्हटले आहे, तर जितेन्द्र आव्हाड यांनी त्यांना आता ‘ शिंदे साहेब केम छो!’ असे म्हणायचे का? असा सवाल केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, यांनी हा माणूस मंत्रिमंडळात कसा? असा सवाल केला.शिंदें विरोधात सर्वत्र टीका होत असून पुण्यात मनसेने आंदोलन करत निषेधही केला आहे. सुषमा अंधारे, एकनाथ खडसे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिला, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘यापूर्वी एकदा शरद पवार यांनी ‘ जय महाराष्ट्र’ आणि ‘ जय कर्नाटक’ असे म्हटले होते. याचा अर्थ त्यांचं कर्नाटकवर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर प्रेम नाही असं समजायचं का? आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो, त्या संदर्भात आपण बोलत असतो. आता गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर जय गुजरात म्हटलं, म्हणजे एकनाथ शिंदे यांचं गुजरातवर प्रेम वाढलं आणि मराठीवरचं प्रेम कमी झालं, इतका संकुचित विचार माणसाला शोभत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटल्याने यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टोला हाणला आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे आश्चर्य वाटते की पुण्यासारख्या शहरात असे बोलणे कितपत शोभते? आता शिंदे साहेब भेटल्यावर असे म्हणायचे का?’ केम छो शिंदे साहब.?’ अमित शाह खुश होतील की नाही माहीती नाही, पण शिंदे यांच्यामुळे मराठी माणूस नाराज झाला आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊतांनी तिखट प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले की, ‘अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले. पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर ‘जय गुजरात’ ची गर्जना केली. काय करायचं? हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो?’ असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जन्म सुरत मध्ये झाला, शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत हे मी वारंवार सांगतो असा पुनरुच्चारही त्यांनी केला.

ज्या एकनाथ शिंदेंचा देह या महाराष्ट्रात, मराठी मातीत पोसला गेला आहे, मराठी माणसांनी भरभरून प्रेम दिलं त्यांच्याशी प्रतारणा करत एकनाथ शिंदे ‘जय गुजरात’ म्हणाले. एकनाथ शिंदेंकडे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता हा गुण नसला तरी त्यांच्याकडे ‘धूर्तपणा’ हा आहे अशी टीका शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे हे गुजरात सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाले होते. म्हणून ‘जय गुजरात’ म्हणून ते लांगुल चालन करत होते. असा तिरकस टोला शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी लगावला आहे. व्यापारी विजय केडिया याने मराठीद्रोही वक्तव्य केले आहे. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले की ते महाराष्ट्रद्रोही आहेत, सरकारने काहीतरी कृती केली पाहिजे. महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे असेही ते म्हणाले.