mangalprabhat-lodha-jain-minority-status-controversy-maharashtra-reaction : लोढांच्या वक्तव्यावर तीव्र संताप, ‘ओळख नाकारण्याचा प्रयत्न’ म्हणत समाजाचा विरोध
Mumbai: राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या जैन समाजाबाबतच्या वक्तव्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला असून, जैन समुदायात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जैन समाजाने अल्पसंख्याक दर्जाचा त्याग करून हिंदू म्हणून मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन लोढा यांनी केल्यानंतर या मुद्द्यावरून ‘धर्मयुद्ध’सदृश वातावरण तयार झाल्याचे चित्र आहे.
लोढा यांच्या या विधानावर जैन समाजातील विविध स्तरांतून नाराजी व्यक्त करण्यात येत असून, जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी या वक्तव्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, जैन धर्म हा स्वतंत्र, प्राचीन आणि वैज्ञानिक तत्त्वज्ञान असलेला धर्म असून त्याची स्वतःची वेगळी ओळख आहे. जैन धर्म हा हिंदू धर्माची शाखा नसून धर्म आणि संस्कृती यामधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. जैन समुदायाला मिळालेला अल्पसंख्याक दर्जा हा कोणतीही सवलत नसून तो घटनात्मक अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Iran war : अणुबॉम्ब वाहक ‘डूम्सडे प्लेन’च्या हालचालींमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण !
अल्पसंख्याक दर्जा हा जैन समाजाच्या स्वतंत्र अस्तित्वाचा सन्मान असल्याचे सांगत हा दर्जा सोडणे म्हणजे स्वतःची ओळख नाकारणे होय, असा इशारा त्यांनी दिला. अशा कोणत्याही प्रयत्नांना सर्व स्तरांवर विरोध केला जाईल आणि हा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न झाला तर तो पूर्ण ताकदीने हाणून पाडला जाईल, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. जैन समाज आता या मुद्द्यावर शांत बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या वक्तव्यात जैन धर्म हा मूळ हिंदू संस्कृतीचाच भाग असल्याचा दावा केला होता. मुघल, इंग्रज आणि त्यानंतर काँग्रेसने ‘फूट पाडा आणि राज्य करा’ या धोरणातून हिंदू समाजाचे विभाजन केल्याचा आरोप करत त्यांनी जैन समाजाने अल्पसंख्याक दर्जा झुगारून मुख्य प्रवाहात येण्याची वेळ आल्याचे म्हटले होते. तसेच, याबाबत समाजातील संत, मुनी आणि विचारवंतांशी चर्चा सुरू असल्याचे सांगत व्यापक सहमती निर्माण झाल्यास कायदेशीर प्रक्रिया राबवण्याचाही संकेत त्यांनी दिला होता.
Ashok kharat case : लैंगिक शोषणाची कबुली, ‘हातचलाखीला विज्ञानाचं नाव’ देत फसवणुक
या संपूर्ण घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली असून, अल्पसंख्याक दर्जा आणि धार्मिक ओळख यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवर पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला आहे. आगामी काळात या वादाचे स्वरूप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








