Jamnalal Bajaj Seva Trust will dig wells for farmers : जमनालाल बजाज सेवा ट्रस्टचा शेतकरी हिताचा उपक्रम
Wardha Farmer शेतकऱ्यांना पीकपद्धती बदलण्यासाठी सिंचनाची व्यवस्था करणे गरजेचे आहे. जमिनीत पाणी असूनही अनेकांना विहिरींचे खोदकाम करणे आर्थिक तंगीमुळे जड जाते. ही गोष्ट हेरून जमनालाल बजाज सेवा ट्रस्टने आता पाच ते पंधरा एकरापर्यंतच्या शेतकऱ्यांना विहिरीचे खोदकाम करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरडवाहू शेतात वर्षातून एकच पीक घेता येते. त्या पिकाच्या भरवशावर शेतकऱ्यांना उदरनिर्वाह करून मुलाबाळांचे शिक्षण करणे अवघड होते. शासकीय योजनांच्या अटी, शर्ती, आर्थिक मर्यादांमुळे शेतकरी इच्छा असूनही विहीर खोदण्यास धजावत नाही. त्यांना एकाच पिकावर अवलंबून राहावे लागते. आता अशा शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करण्यासाठी जमनालाल बजाज सेवा ट्रस्टने विहिरी खोदून देण्याचा संकल्प नववर्षात केला आहे. त्यानुसार कार्यही सुरू केले आहे.
Vijay Wadettiwar : वाल्मिक कराडच्या जीवाला सत्ताधाऱ्यांकडूनच धोका !
समुद्रपूर तालुक्यात दोन शेतकऱ्यांना विहिरी खोदून देण्यात आल्या आहे. आता बांधकाम शेतकरी करणार आहेत. विहीर खोदल्यानंतर पाणी लागल्याचे पाहून शेतकऱ्यांचा हुरूप वाढला आहे. त्यामुळे येत्या कालावधीत पाच ते पंधरा एकरापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या शेतांत विहीर असावी, असा प्रयत्न संस्थेने चालविला आहे.
जमनालाल बजाज सेवा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण व शेती या दोन विषयांवर गेल्या दहा वर्षांपासून काम सुरू आहे. यातूनच पाच ते पंधरा एकर शेती असलेल्या शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या लक्षात आली. शासनाची अल्पभूधारक शेतकऱ्यांकरिता विहीर बांधकामाची योजना आहे. मात्र, पाच एकरावरील शेतकरी योजनेत बसत नाही.
आता जमनालाल बजाज सेवा ट्रस्टने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. 10 टक्के शेतकऱ्यांचा सहभाग व 90 टक्के संस्थेचा सहभाग देऊन 40 फुटांपर्यंत विहिरीचे खोदकाम करून दिले जात आहे. नंतर ब्लास्टिंगची आवश्यकता पडल्यास ब्लास्टिंग आणि बांधकामाचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.
जमनालाल बजाज सेवा ट्रस्टच्या वतीने वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर या पाच तालुक्यांत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यातून पीकपद्धतीत बदल होईल, रोजगार निर्मितीही होईल, असा आशावाद ट्रस्टने व्यक्त केला आहे. सध्या एका गावात एका शेतकऱ्याला विहीर, असे नियोजन असून, भविष्यात आणखी वाढ केली जाणार आहे.