NCP MLA say that even if they change their minds, their nature will not change : मुख्यमंत्री किती गांभीर्याने हा प्रश्न सोडवतात, हे बघावे लागेल
Nagpur : राज्य सरकारमधील काही मंत्र्यांना काढण्याच्या चर्चा जोरावर सुरू आहेत. शिवसेनेचे चार आणि राष्ट्रवादी व भाजपचे प्रत्येकी दोन अशा आठ मंत्र्यांना मंत्रीमंडळातून डच्चू मिळण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. मंत्रीमंडळात खांदेपालट निश्चित होणार, असे मानले जात आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते आमदार जयंत पाटील यांनी महत्वाचे विधान केले आहे. कितीही खांदेपालट केले तरी स्वभाव बदलत नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.
नागपुरात काल (२५ जुलै) आले असता जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, काही मंत्र्यांना काढायचं की नाही, हे आम्ही नाही सांगू शकत. मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याची वाट आम्ही बघत आहोत. त्यांच्या लोकांनी केलेले वक्तव्य भारतीय जनता पक्षाला मान्य आहे, असंच एकंदरीत परिस्थितीवरून वाटतंय. आमचा नाराज होण्याचा प्रश्नच नाही. भाजपचे प्रमुख नेते कुणीच नाराज नसतील तर त्यांची या प्रकाराला मान्यता आहे, असंच समजावं लागेल. मुख्यमंत्री किती गांभीर्याने हा प्रश्न सोडवतात, हे बघावे लागेल. मुख्यमंत्र्यांमध्ये किती सहनशीलता आहे, हेसुद्धा बघावे लागेल.
जयंत पाटील यांनी नुकताच दिल्लीचा दौरा केला. याबद्दल विचारले असता, शुगर टेक्नॉलॉजी असोसीएशन ऑफ इंडियाचे उद्घाटन होते, त्या कार्यक्रमासाठी गेलो होतो. मी अनेक वर्षांपासून शुगर असोसिएशनचे काम करतो. त्यामुळे त्यात पुढारी नसल्याने त्यांनी मला तो पुरस्कार दिला. असे पाटील म्हणाले. दिल्लीत भाजपच्या नेत्यांना भेटले का, असा प्रश्न विचारला असता, मी गेलो, जेवण केलं आणि विमानतळावरून परत आलो, असा दिनक्रम जयंत पाटील यांनी सांगितला.