Revenue department destroys eight boats in reservoir : महसूल विभागाने जलाशयातील आठ बोटी केल्या नष्ट
Buldhana : देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणाच्या जलाशयात अवैध रेती उपसा करणाऱ्या बोटींचा शोध घेण्यासाठी महसूल विभागाने जिल्हा स्तरीय शोध व बचाव पथकाच्या सहाय्याने शोध मोहीम राबवली. महसूल आणि पोलिस विभागाने राबवलेल्या या संयुक्त मोहिमेत काही बोटी मालकांनी भीतीने बोटी बुडवल्याची माहिती मिळाली आहे. ही मोहिम दिवसभर सुरू होती.
या मोहिमेत, दुपारी ४ वाजताच्या सुमारास मौजे गारखेड व मंडप गावांच्या सीमेजवळ चार फायबर बोटी आणि चार इंजिन बोटी, अशा एकूण आठ बोटी पकडण्यात आल्या. त्यामधील मजूर पळून गेल्यामुळे मालकांची ओळख पटली नाही. या आठही बोटी किनाऱ्यावर आणून स्फोटकांनी नष्ट करण्यात आल्या.
धरणाच्या जलाशयाचा मोठा परिसर आणि बेशरम झाडी यांमुळे शोध मोहिमेत अडचणी आल्या. पकडलेल्या बोटी नष्ट करण्यासाठी जिलेटिनच्या साहाय्याने चार वेळा स्फोट करण्यात आला. ही कारवाई रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होती. खडकपूर्णा धरणात नियमितपणे मोहीम राबवून कारवाई करण्यात येईल. जलाशयात बोटींची अनधिकृत हालचाल रोखण्यासाठी कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी दिली.
ही कारवाई जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनात आणि उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या उपस्थितीत पार पडली. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार प्रवीण घोटकर, सायली जाधव, मंडळ अधिकारी विजय हिरवे, काशिनाथ ईप्पर, रामदास मांटे, प्रल्हाद केदार, ग्राम महसूल अधिकारी विलास नागरे, परमेश्वर बुरकुल, संजय हंडे, सुरेश डोईफोडे, मधुकर उदार, संजय बरांडे, राजू तागवाले, आकाश खरात, तेजस शेटे, कृष्णा खरात आणि खडकपूर्णा प्रकल्प उपविभागाचे अधिकारी एस. जे. तल्हार यांचा सहभाग होता.
शोध व बचाव पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तारासिंग पवार, पोलीस कॉन्स्टेबल गुलाबसिंग राजपूत, संदीप पाटील, सलीम बरडे, प्रदीप सोनुने आणि पोलीस विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण गीते, हेड कॉन्स्टेबल डिघोळे, ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोहिमेत सहभाग घेतला.