khamgaon-municipal-council-general-meeting-opposition-role-discussion : सत्ताधाऱ्यांना घेरण्यात विरोधक अपयशी; पाणीपुरवठा आणि करवाढीच्या मुद्द्यावर आक्रमक नाहीच
Khamgao खामगाव नगरपालिकेची नुकतीच पार पडलेली पहिली सर्वसाधारण सभा सत्ताधारी आणि विरोधक या दोन्ही गटांसाठी आपले राजकीय वर्चस्व सिद्ध करण्याची मोठी संधी होती. विशेषतः अल्प संख्याबळ असूनही प्रखर मुद्द्यांच्या आधारे विरोधक सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील, अशी जनसामान्यांची अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्ष सभेच्या कामकाजात विरोधकांचा आवाज क्षीण भासल्याने राजकीय वर्तुळात “विरोधकांची धार नक्की गेली कुठे?” अशा चर्चांना उधाण आले आहे.
शहरात सध्या वाढीव करमूल्यांकन, विस्कळीत पाणीपुरवठा आणि मूलभूत नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला असताना, या ज्वलंत प्रश्नांवर सभागृहात जोरदार खडाजंगी होणे अपेक्षित होते. नगरपालिकेत लोकनियुक्त प्रतिनिधी आल्यानंतर ही पहिलीच महत्त्वाची सभा असल्याने शहरवासीयांचे डोळे याकडे लागले होते. मात्र, अनेक महत्त्वाचे विषय विनाचर्चा किंवा अगदी सौम्य विरोधात मंजूर झाल्याने विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, विरोधकांच्या या ‘मवाळ’ भूमिकेमागे काही महत्त्वाची कारणे असू शकतात. विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये धोरणात्मक एकजुटीचा अभाव असल्याने सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी ठोस रणनीती आखता आली नसल्याचे बोलले जात आहे. संख्याबळ कमी असल्याचा मानसिक दबावही चर्चेदरम्यान जाणवला. काही वर्तुळात तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पडद्यामागे काही ‘तडजोड’ तर झाली नाही ना, अशी कुजबूजही सुरू झाली आहे.
Sanjay Gaikwad : शिंदेसेनेत पक्षप्रवेशांचा जोर; निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्नचिन्ह
पहिल्या सभेत विरोधकांची बॅटिंग संथ झाली असली तरी, आगामी काळात हे चित्र बदलेल अशी आशा त्यांच्या समर्थकांना आहे. शहरातील प्रलंबित प्रश्न आणि नागरिकांच्या तक्रारी वाढत असल्यामुळे, पुढच्या सभांमध्ये विरोधक अधिक अभ्यासू आणि आक्रमक मांडणी करतात की सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली राहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.








