Khamgao Nagar Parishad : अबब! खामगाव नगर परिषदेत ५ कोटींची करवाढ प्रस्तावित

₹5 crore tax hike proposed in Khamgaon Municipal Council : हरकतींसाठी नागरिकांची तोबा गर्दी, सत्ताधाऱ्यांविरुद्ध रोष, आक्षेप घेण्यासाठी थकीत कर भरण्याची अट

Khamgao खामगाव नगरपालिकेकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या मालमत्ता करवाढीमुळे शहरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या सुमारे ७ कोटी रुपयांचा असलेला कर आकारणीचा आकडा तब्बल १२ कोटी रुपयांवर नेण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याने जवळपास ५ कोटी रुपयांची करवाढ अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात अनेक मालमत्तांवर सरासरी ३ ते ८ पट वाढ सुचविण्यात आल्याचे बोलले जात असून एकूण करवाढ २५ कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

प्रचंड करवाढीविरोधात मालमत्ताधारकांनी हरकत नोंदविण्यास सुरुवात केली असून नगरपालिकेत दररोज मोठी गर्दी होत आहे. हरकत दाखल करण्यापूर्वी संबंधित मालमत्तेवरील संपूर्ण थकीत कर भरणे बंधनकारक असल्याने कर वसुलीतही अचानक वाढ झाल्याचे चित्र आहे.

Misuse of government funds : निकृष्ट कामे, निधी गैरवापराचा आरोप; चौकशीची मागणी

दरम्यान, अनेक नागरिकांना जानेवारीच्या अखेरीस नोटिसा मिळाल्यामुळे हरकत नोंदविण्यासाठी आवश्यक ३० दिवसांचा कालावधी मिळालेला नाही. त्यामुळे हरकत दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील सुमारे ३१ हजार मालमत्ताधारकांना नोटिसा बजाविण्यात आल्या असून पाणीपट्टी व दिवाबत्ती करांचाही यात समावेश आहे. ८ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीप्रमाणे ६ फेब्रुवारी ही हरकत नोंदविण्याची अंतिम तारीख ठरते.

विशेष म्हणजे, तब्बल १३ वर्षांनंतर करण्यात आलेली ही करवाढ नागरिकांसाठी धक्कादायक ठरल्याची भावना व्यक्त होत आहे. करवाढीबाबत सत्ताधाऱ्यांनी ठोस भूमिका स्पष्ट न केल्याने नाराजी वाढत असून “एकहाती सत्ता देणे चूक ठरले का?” असा सवालही मालमत्ताधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

Water Shortage : कोट्यवधींच्या योजना कागदावरच; पाणीटंचाईचा कहर!

हरकतींची संख्या वाढत असताना अपील प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कर किती निश्चित होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र एकूणच प्रस्तावित करवाढीमुळे खामगावात नागरिकांमध्ये तीव्र रोष पसरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.