Only 10 percent loan disbursement is done : बँकांच्या कारभारावर ठाकरे गटाची टीका, आंदोलनाचा इशारा
Buldhana खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला असताना शेतकरी अजूनही हक्काच्या पीककर्जापासून वंचित आहे. पीककर्ज वितरणात केवळ १० टक्क्याच्या आत वाटप झाल्याचे वास्तव असताना, शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्यांकडे सरकार आणि बँक यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने केला आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तीव्र आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन सादर केले. खरीप पेरणीसाठी लागणाऱ्या पिक कर्जाचे उद्दिष्ट १५०० कोटी रुपये असताना, आजपर्यंत केवळ १५० कोटी रुपयांचेच कर्ज वितरित झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये यामुळे तीव्र अस्वस्थता आहे.
E-bike taxi permission : ई-बाईक टॅक्सीच्या विरोधात ऑटोचालकांचा एल्गार!
बँकांकडून सातत्याने अतिरिक्त कागदपत्रांची मागणी, विलंब, आणि अनाठायी अटी घालून शेतकऱ्यांची मानसिक कुचंबणा केली जात आहे, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. जालिंदर बुधवत यांनी स्पष्ट इशारा दिला की, “बँकांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने बँक अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन कठोर निर्देश द्यावेत. अन्यथा शिवसेनेला रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडावे लागेल.”
सर्कलनिहाय पीककर्ज वितरणाची माहिती तातडीने प्रसिद्ध करावी.बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी भरारी पथके आणि तपासणी समित्या तत्काळ सक्रीय कराव्यात. खरीप हंगामासाठी आवश्यक खते आणि बी-बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध करून द्यावा.अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या फळपिक बागायतदारांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी.
या मागण्यांचे निवेदन सादर करताना जिल्हा महिला आघाडी प्रमुख चंदाताई बढे, उपजिल्हाप्रमुख सुनील घाटे, लखन गाडेकर, विजय इंगळे यांच्यासह शेकडो शिवसैनिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी “शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणारच!” असा निर्धार व्यक्त केला.