An independent nomination filed by the wife of the BJP MLA’s PA : आमदार किशोर जोरगेवारांच्या भूमिकेबाबत प्रश्न, ‘आतल्या राजकारणाचा’ पर्दाफाश
Chandrapur : चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात अस्वस्थता आणि संघर्ष उघडपणे समोर आला असून या गोंधळाच्या केंद्रस्थानी थेट महानगरपालिका निवडणुकीचे प्रमुख आणि आमदार किशोर जोरगेवार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. भाजपचे निवडणूक प्रमुख असलेल्या जोरगेवार यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने थेट अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने भाजपच्या संघटनात्मक शिस्तीवर आणि नेतृत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
चंद्रपूर महापालिकेतील प्रभाग क्रमांक १० हा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटणार असल्याची चर्चा आधीपासून होती. या प्रभागात राष्ट्रवादीकडून राशिद हुसेन यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार जोरगेवार यांचे स्वीय सहाय्यक ललित कासट यांच्या पत्नीने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. पक्षावर विश्वास राहिला नसल्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागल्याचा गंभीर आरोप स्वतः ललित कासट यांनी केला आहे.
municipal elections : ‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजप वगळून शिंदे–अजितदादा एकत्र
ललित कासट यांनी थेट आरोप करत सांगितले की, विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान राशीद यांनी भाजपविरोधी कामे केली होती, तरीही पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. उलट पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करूनही आपली दखल घेतली गेली नाही. नगरपालिका अस्तित्वात आल्यापासून गेल्या ३० ते ३५ वर्षांत त्या प्रभागातून भाजपचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. आम्ही त्या भागात सातत्याने काम करून पक्षाची ताकद वाढवली, मात्र तरीही पक्षाने तिकीट नाकारले, सर्वेक्षणातसुद्धा पत्नीचे नाव पाठवले गेले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
या सगळ्या नाट्यमय घडामोडी घडत असतानाच भाजपने किशोर जोरगेवार यांच्याकडेच चंद्रपूर महापालिकेच्या निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे, जोरगेवार यांचे अत्यंत निकटवर्ती असलेल्या राशीद यांनी ऐनवेळी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेतली आणि त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आधीच सुरू होती. आता त्याच मालिकेत जोरगेवारांचे स्वीय सहाय्यक ललित कासट यांनी पत्नीचा अपक्ष अर्ज दाखल केल्याने अंतर्गत फूट अधिकच ठळक झाली आहे.
BMC election : ‘आमच्याकडून विषय संपवला’; संजय राऊतांचे स्पष्टीकरण
किशोर जोरगेवार यांनी २०२४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून चंद्रपूर भाजप कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं बोललं जातं. त्यातच त्यांनी अट्टहासाने महापालिका निवडणूक प्रमुखपद मिळवलं. या पदासाठी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. मात्र आता त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षातच नाराजीचा स्फोट होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे.
या सगळ्या प्रकरणात सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे या राजकीय खेळीमागे खुद्द जोरगेवार यांचीच रणनीती आहे का, असा संशय उघडपणे व्यक्त केला जात आहे. एका बाजूला आपल्या निकटवर्तीय राशीद यांना राष्ट्रवादीकडे पाठवून तिकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न, तर दुसऱ्या बाजूला स्वीय सहाय्यकाच्या पत्नीला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवणे, हा सगळा प्रकार राजकीय दबावतंत्र आहे की वैयक्तिक फायद्यासाठी रचलेली खेळी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Municipal election : अकोल्यात बच्चू कडू – उद्धव ठाकरे यांची युती
या साऱ्या घटनांमुळे चंद्रपूरच्या राजकारणात एक प्रश्न निर्माण झाला आहे. ज्याला स्वतःचे निकटवर्तीय, स्वीय सहाय्यक आणि कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत, जो पक्षांतर्गत बंडखोरी रोखू शकत नाही, तो नेता खऱ्या अर्थाने पक्षाची जबाबदारी, मतदारसंघाची जबाबदारी आणि आता चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकतो का? या प्रश्नाने सध्या चंद्रपूरचे राजकारण अक्षरशः ढवळून निघाले असून भाजपसाठी ही केवळ निवडणूक नव्हे तर नेतृत्वाची कसोटी ठरण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.








