Ladki Bahin Yojana : एका कॉलवर तक्रारींचे निरसन करण्यासाठी 181 हेल्पलाईन सुरू !

Big announcement for women beneficiaries of Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा

Mumbai : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना येणाऱ्या अडचणी आणि तक्रारी तातडीने सोडवण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. योजनेसंदर्भातील सर्व शंका, तक्रारी आणि समस्यांचे निरसन एका कॉलवर व्हावे, यासाठी 181 हा महिला हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास लाभार्थी महिलांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधावा, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची इ केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थी महिलांकडून चुकून चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे त्यांचा लाभ तात्पुरता स्थगित झाल्याच्या तक्रारी महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तसेच योजनेशी संबंधित इतर सर्व तक्रारी आणि शंकांचे निरसन फोनद्वारे करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाईन क्रमांकावर विशेष मदत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. या हेल्पलाईनवरील कॉल ऑपरेटर्सना योजनेबाबत सविस्तर आणि योग्य प्रशिक्षण देण्यात आले असून लाभार्थींना अचूक माहिती आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे.

Akola Municipal Corporation : भाजपच्या गळाला शरद पवारांचे तीन नगरसेवक, ४४ जणांचा गट स्थापन

महाराष्ट्रातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व लाभार्थी महिलांना 31 डिसेंबर 2025 पर्यंत केवायसी पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी झालेल्या त्रुटींची दखल घेत, योजनेच्या निकषांनुसार अशा लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष क्षेत्रीय पडताळणी करण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 महिन्याचा प्रत्येकी 1500 रुपयांचा हप्ता अद्याप काही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्यामुळे विदर्भातील भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये महिलांनी आंदोलन केल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. नोव्हेंबर महिन्याचा लाभ डिसेंबरच्या अखेरीस आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आला, तर डिसेंबर महिन्याचा लाभ 14 जानेवारीच्या सुमारास लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Amravati APMC dissolved : अमरावती बाजार समिती बरखास्त; प्रशासक मंडळ नियुक्त

या पार्श्वभूमीवर, 181 या हेल्पलाईन क्रमांकामुळे लाडक्या बहिणींना त्यांच्या तक्रारी आणि शंकांचे निरसन जलदगतीने होणार असून योजनेच्या अंमलबजावणीला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.