Land smugglers attempted to attack on revenue officers : महसूल अधिकाऱ्यांच्या पथकावर टिप्पर चढवण्याचा प्रयत्न
Amravati जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महसूल मंत्री जिल्ह्यात असतानाच वाळू तस्करांनी महसूल अधिकाऱ्यांच्या पथकावर टिप्पर चढवण्याचा प्रयत्न केला. ही घटना शासन व प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत आहे.
२१ फेब्रुवारीच्या रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांनी महसूल पथकाला चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तलाठ्याची नव्याकोरी दुचाकी चेंदामेंदा झाली. मात्र, महसूल अधिकारी आणि तलाठ्यांनी वेळीच उड्या मारून स्वतःचा जीव वाचवला. हा धक्कादायक प्रकार चांदूरबाजार पोलिस ठाणे हद्दीत घडला.
गेल्या काही दिवसांत अचलपूर व चांदूरबाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू आहे. महसूल मंत्री वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याच्या तयारीत असतानाच महसूल अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याने प्रशासनाचे अपयश समोर आले आहे.
Chandeashekhar bawankule : दोषी आढळल्यास अभियंत्यांवर कारवाई!
२१ फेब्रुवारी रोजी रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास महसूल पथक अब्दालपूर शिवारातील ई-क्लास येथे कारवाईसाठी गेले होते. या पथकात ग्राम महसूल अधिकारी तलाठी विश्वजीतसिंग बंगरे, मंडळ अधिकारी राजेश व्यवहारे, अनिल पोटे, संतकुमार चव्हाण, राहूल जोशी, संजय चौधरी, निवृत्ती घुलक्षे, प्रफुल्ल पाटील, प्रफुल्ल डवरे आणि मनिष खलोकार या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
यावेळी प्रफुल्ल डवरे आणि मनिष खलोकार हे दुचाकीवरून जात असताना, समोरून येणाऱ्या अवैध वाळूने भरलेल्या टिप्परला (MH 29 BE 5101) थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने वेगाने टिप्पर पळवण्याचा प्रयत्न केला. महसूल अधिकाऱ्यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने त्यांची दुचाकी उडवून लावली. त्यामुळे मंडळ अधिकारी राजेश व्यवहारे आणि तलाठी विश्वजीत बंगरे यांनी उड्या मारून आपला जीव वाचवला. मात्र, त्यांची दुचाकी पूर्णतः चेंदामेंदा झाली.
टिप्परचालक इमरान खान अबरार अहमद खान (रा. रामभट्ट प्लॉट, चांदूरबाजार) याला विचारणा केली असता, हा टिप्पर पिंटू नवाब या व्यक्तीच्या मालकीचा असल्याचे त्याने सांगितले. घटनास्थळी पिंटू नवाब स्वतः हजर झाला आणि महसूल अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.
Akash fundkar : सहाय्यक आयुक्तांच्या पत्रातच काम रद्द केल्याचे उल्लेख!
या घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी विश्वजीतसिंग बंगरे यांच्या तक्रारीवरून, इमरान खान अबरार अहमद खान याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 132, 303(2), 281, 324(4)(5), 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार तलाठी विश्वजीत बंगरे हे अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच या पदावर रुजू झाले होते. ते थुगाव प्रिपी महसूल साझावर कार्यरत होते आणि काही महिन्यांपूर्वीच नवीन दुचाकी खरेदी केली होती. मात्र, महसूल कारवाईदरम्यान ती टिप्परखाली चिरडली गेली.
या घटनेमुळे वाळू तस्करांची दहशत आणि महसूल अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महसूल मंत्र्यांनी वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतरही महसूल कर्मचाऱ्यांवर असे हल्ले होत आहेत, याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.